पुणे – एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी लोणावळा दर्शन ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना लोणावळा परिसरातील विविध ठिकाणांना भेटी देता येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना एकाच गाडीतून विविध ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळांना भेट देता यावी, यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. 13 डिसेंबरपासून पुण्यातून अष्टविनायक आणि महाबळेश्वर दर्शन या दोन मार्गांवर बससेवा सुरू केली होती. या सेवाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, त्याच धर्तीवर लोणावळा दर्शन ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
27 डिसेंबरपासून दर रविवारी स्वारगेट आगारातून स्वारगेट-लोणावळा दर्शन सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्वारगेट-लोणावळा दर्शन या मार्गावर स्वारगेटहून निमआराम गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही बस प्रतिशिर्डी, भूशी डॅम, राजमाची पॉईंट, नारायणधाम मंदिर, एकवीरा कार्ला या ठिकाणांहून जाणार आहे. या फेरीसाठी स्वारगेट-लोणावळा दर्शन या सांकेतिक कोडचा वापर करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
या बसेस ऑनलाइन आरक्षण सुरू झाले असून, नागरिकांनी संकेतस्थळ किंवा ऍपचा वापर करून आरक्षण करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.