नवी दिल्ली – महालेखापाल म्हणजेच कॅगच्या यंत्रणेतील प्रिंसिपल डायरेक्टर शारदा सुब्रमण्यम यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. कॉफी बोर्डाच्या संचालक मंडळावर काम करीत असताना त्यांनी तेथे आर्थिक घोटाळा केल्याची बाब समोर आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्या 1991 बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांच्यावरील कारवाईला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 19 मे रोजीच अनुमती दिली होती.
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली होती. ती ग्राह्य धरण्यात आली आहे. आपल्यावरील आरोपांच्या संबंधात 250 पानी निवेदन देऊन सुब्रमण्यम यांनी बचाव केला होता, पण तो कॅगने अमान्य करीत त्यांच्यावर ही कारवाई केली. या प्रकरणी त्यांनी लवादाकडेही दाद मागितली होती पण तेथेही त्यांना दाद मिळू शकली नाही.