नवी दिल्ली – टर्बनेटर म्हणून ऑस्ट्रेलियासह जगभरातील बलाढ्य क्रिकेट संघातील फलंदाजांना आट्यापाट्या खेळायला लावणारा महान ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंग याने लवकरच निवृत्ती जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
रवीचंद्रन अश्विन संघात आल्यानंतर खरेतर हरभजन सिंगला जास्त संधी मिळाली नाही. त्याचे वयदेखील जास्त झाल्याने फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच त्याला जेव्हा संधी दिली गेली तेव्हा त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही व त्याचवेळी अश्विनने सरस कामगिरी केल्याने त्याचे संघातील स्थान निश्चित झाले व हरभजनला स्थान मिळणे कठीण झाले. यावेळी त्याने केवळ आयपीएलवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर तो चेन्नई संघाकडे गेला. आता पुन्हा भारतीय संघात स्थान मिळणे शक्य नसल्याची साक्ष पटल्याने त्याने निवृत्तीचा विचार सुरू केला असल्याचे मत व्यक्त केले.
आता करोनामुळे गेले 4 महिने क्रिकेट ठप्प आहे. हा धोका कधी संपुष्टात येईल तेदेखील सांगता येत नाही. त्यामुळे पुढील काळातही भारतीय संघात स्थान मिळणे शक्य नसल्याचेही त्याला समजून चुकले असल्याने त्याने अखेर लवकरच निवृत्ती जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.