पुणे – राज्यातील बिअरबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून बिअरचे दर कमी करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. तथापी बिअरवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आले नसल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. राज्यास एप्रिल ते आॉक्टोंबर २०२३ या कालावधीत बिअर विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी २ हजार ३४ कोटी इतका महसूल प्राप्त असून गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के वाढ झाली असल्याचे देसाई यांनी सांगितले.
बिअरच्या दराबाबत शासनाने नेमलेल्या समितीबाबतचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मंत्री देसाई यांनी ही माहिती दिली. राज्याचे महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाकडून निरनिराळे प्रयत्न करण्यात येत आहे. तथापी इतर राज्यांनी केवळ होलोग्राम अथवा क्यु आर कोडच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रणाली राबविल्यामुळे त्यांच्या महसुली उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे निश्चितपणे अनुमान काढता येत नसल्याचे देसाई यांनी सांगितले.
तसेच विभागाच्या कामकाजात सुलभता आणण्याकरीता व उत्पादन शुल्क महसुल वाढीकरीता सध्यस्थितीत मद्य उत्पादकापासून ठोक विक्रेता ते किरकोळ विक्रेता या वितरण साखळीमध्ये प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पुरवठा साखळी व्यवस्थापन ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.