लक्षणे दिसणाऱ्यांची तपासणी होणार
नागरिकांनी सहकार्य करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन
पुणे – करोनाचे रुग्ण आढळलेल्या तीन किलोमीटरचा परिसर हा “बफर झोन’ म्हणून जाहीर केला आहे. या “बफर झोन’मधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून ज्या नागरिकांमध्ये करोनाचे लक्षणे दिसतील, त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. दरम्यान, कोणत्याही नागरिकांना त्रास द्यायचा आमचा हेतू नाही, नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ जणांना करोनाची बाधा झाली आहे. यातील सात जण हे दुबई येथील सहलीतील आहेत, तर एक रुग्ण हा कॅब ड्रायव्हर आहे.
करोनाबाधितांवर पुणे शहरातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि पिंपरीमधील वायसीएम रुग्णालय येथे उपचाराची व्यवस्था केली आहे. करोनाची बाधा झालेल्या व्यक्ती रहात असलेला परिसराचे जीपीएस मॅपिंग करण्यात येत आहे. या परिसरातील 214 नागरिकांची तपासणी केली. यामध्ये 158 जणांना सोडण्यात आले आहे. अजूनही 54 नागरिक विलगीकरण कक्षात आहेत. यातील 213 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीमध्ये पाठवले होते. यातील 171 व्यक्तींचे अहवाल आले आहेत. यातील 161 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून आठ व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन व्यक्तींची तपासणी करून त्याचे नमुने तपासणीसाठी पुन्हा पाठवले आहेत. अजूनही 42 व्यक्तींचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. हे 42 व्यक्ती या परदेशात प्रवास करून आलेल्या आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
या 42 व्यक्तींच्या संपर्कातील 614 नागरिकांना ट्रॅक केले आहे. यातील 325 जणांचा 14 दिवसांचा कालावधी संपलेला आहे. या व्यक्तींमध्ये कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. अजून 14 दिवस व्यक्तींकडे पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार आहे. तर 289 व्यक्तींचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. त्यांना घरीच थांबण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक यांना करोनाची लागण होण्याची शक्यता असू शकते. त्यांच्या कुटुंबियांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी अपवादात्मक परिस्थितीतच घराबाहेर पडा. करोनाचा विषाणू वेगाने पसरतो. याचे संक्रमण आपण थांबवू शकतो. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी