गणेशोत्सवात चोरट्यांची यंदाही हातसफाई

श्रींच्या मिरवणुकीवेळी बेलबाग चौकात अनेकांचे मोबाइल चोरीस

पुणे – गणेशोत्सवाचा प्रारंभ झाल्यानंतर बेलबाग चौकात गर्दीची संधी साधत चोरट्यांनी हातचलाखी दाखविण्यास सुरुवात केली आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर बेलबाग चौक ते हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात सोमवारी चोरट्यांनी दर्शनासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल संच तसेच महिलांकडील ऐवज लांबविल्याच्या घटना घडल्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळांच्या उत्सव मंडप तसेच हुतात्मा बाबू गेनू चौक ते मंडई परिसरात सोमवारी भाविकांची गर्दी उसळली होती. अनेकांनी सहकुटुंब दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्रीपर्यंत गर्दी कायम होती.

चोरट्यांनी गर्दीत काही जणांचे मोबाइल संच तसेच ऐवज लांबविल्याच्या घटना घडल्या. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, बेलबाग चौक ते मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. साध्या वेशातील पोलिसांचे पथकही तैनात आहे. याप्रकरणी काही जणांनी विश्रामबाग पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहे. तर, गणेशोत्सवात हात साफ करण्यासाठी आलेल्या एका टोळीला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दरम्यान, ऐन उत्सव काळात चोरटे फोफावणार, हे माहिती असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवली असतानाही चोरटे मात्र बिनधास्त असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

महिलेची रोकड लंपास
लष्कर परिसरात सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरण्यात आली. पर्समध्ये रोख 6 हजार 500 रुपये आणि इतर वस्तू असा 6 हजार 800 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी एका 57 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरट्यांना शोधण्याचे आव्हान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.