दोन्ही डोसनंतरही २० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं नाहीत – आयएलएसचा धक्कादायक दावा

भुबनेश्वर – देशात करोना महासाथीमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. विषाणू संसर्गास अटकाव करण्यासाठी देशात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरु आहे. अशातच भुबनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसने धक्कादायक दावा केला आहे. ओडिशा येथील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांपैकी सुमारे २० टक्के नागरिकांमध्ये करोनाविरोधी अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) तयारच झाली नसल्याचा दावा आयएलएस या संस्थेने केला आहे.

लस घेतल्यानंतर देखील अँटीबॉडीज निर्माण न झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता असल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

“काही करोनाबाधितांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण ३० ते ४० हजारांपर्यंत आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ५० पेक्षा कमी अँटीबॉडीज असतील तर त्याला अँटीबॉडी पॉझिटिव्ह म्हणता येणार नाही. अशा लोकांची संख्या मोठी आहे. लस घेतल्यानंतर शरीरात ६० ते १०० अँटीबॉडीज तरी निर्माण व्हायला हव्यात.” असे आयएलएसचे संचालक अजय परिदा यांनी सांगितले.

“करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील एखाद्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण न होणे हे त्या व्यक्तीच्या जनुकीय संरचनेवर अवलंबून आहे. लस घेतल्यानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होत नसलेल्यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घ्यायला हवी. विषाणू बाधेचा धोका अधिक असल्याने अशा लोकांना बूस्टर डोस देणे गरजेचे आहे.” असेही परिदा यांनी सांगितले.

दरम्यान, ओडिशा येथे ६१.३२ लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यामध्ये भुबनेश्वर येथील १० लाख नागरिकांचा समावेश आहे. मात्र यातील २० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या नसल्याचा दावा करण्यात येतोय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.