नवी दिल्ली – अमेरिकेतील ट्विन टॉवरवर 11 सप्टेंबरला झालेल्या भयावह हल्ल्याच्या 20 व्या स्मृतिदिनी अमेरिकेवर असा भयावह हल्ला पुन्हा होऊ शकतो, असा इशारा चीनच्या सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्स या दैनिकाच्या संपादकांनी दिला आहे.11 सप्टेंबरचा आत्मघाती हल्ला हा 19 दहशतवाद्यांनी घडवला होता. पण तो दहशतवाद्यांसाठी आत्मघाती नव्हता.
पुढील दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवादी ताकद गोळा करत आहेत. चीनला अमेरिका आपला सर्वांत मोठा शत्रू मानते हे चूक असल्याचे काळ सिद्ध करेल, असे ट्विट ग्लोबल टाईम्सचे संपादक हु शिजीन यांनी केले आहे.चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या कमालीचा तणाव आहे. त्याची तीव्रता इतकी आहे की, अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनीही चीमनमधील शिनजिआंग प्रांतातील उघ्यूरमध्ये होणाऱ्या मुस्लिमांवरील कथित अत्याचारांवरून निर्बंध लादले आहेत.
अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी चार व्यावसायिक विमानांचे 11 सप्टेंबर 2001 मध्ये अपहरण केले. त्यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने नेण्यात आली. एक विमान पेंटॅगॉनच्या दक्षिणेला कोसळले, तर चौथे नियोजित लक्ष्य गाठण्याआधी पेनिसिलीया प्रांतात पाडण्यात आले. या हल्ल्यात सुमारे तीन हजार जणांचा बळी गेला.
दहशतवादी हल्ल्यांचा हा दिवस देशवासीयांनी सेवा आणि स्मृतिदिन म्हणून पाळण्याचे आवाहन करीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज या दिवशी अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, चीनने हा स्मृतिदिन उघ्यूर प्रांतात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या कथित प्रचाराला नकार देण्यासाठी वापरला.अमेरिकेने दहशतवादाची व्याख्या त्यांच्या विचारसरणीवर आणि राजकीय स्वारस्यावर करण्याचे थांबवावे, असा सल्ला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिला होता. ते म्हणाले, दहशतवादी हे दहशतवादी असतात.
राजकीय सोयीनुसार दहशतवादाची व्याख्या करण्याने दहशतवादाला प्रोत्साहन मिळते. त्यातून दहशतवादाविरोधातील सहकार्यात अडथळे येतात.शिनजिआंग प्रांतातील मुस्लिमांवर चीन अत्याचार करत असल्याचे वृत्त आहे. वांशिक अल्पसंख्य असणाऱ्या या समूहाला बंदीजन बनवले असल्याच्या बातम्या आहेत. त्यांना वेठबिगाराची वागणूक देत असल्याचे बोलले जाते.