पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या उपसमित्यांच्या अहवालातील शिफारसींच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसाठी उच्च शिक्षण संचालकांनी कार्यालय उपलब्ध करुन द्यावे तसेच आवश्यक मनुष्यबळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त उपसमितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला होता. अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींच्या निवारणासाठी उपाययोजना सुचवणे आणि मार्गदर्शन करण्यासाठी सुकाणू समिती नियुक्त करण्याचा निर्णय राज्यातील विद्यापीठांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार ही समिती नेमण्यात आली आहे.
डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत 14 जणांचा सहभाग आहे. यात डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. व्ही. एस. माहेश्वरी, डॉ. विलास सपकाळ, डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, डॉ. आर. डी. कुलकर्णी, डॉ. अजय भामरे, प्रा. अनिल राव, महेश दाबक, श्रीधर जोशी, माधव वेलिंग, व्ही. एन. राजसेखरन पिल्लई, डॉ. प्रशांत मगर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा समावेश आहे.
समितीची कार्यपद्धत
पदवी अभ्यासक्रम तीन ते चार वर्ष कालावधीचे करणे, पदव्युत्तर अभ्यासक्रम एक ते दोन वर्षे कालावधीचे करणे, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम रचना आणि मल्टिपल एन्ट्री-मल्टिपल एक्झिट पर्यायाची अंमलबजावणी करणे, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीचा समावेश करणे, श्रेयांक निश्चितीची अंमलबजावणी, सर्व विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकात एकसमानता आणण्यासाठीच्या उपाययोजना, श्रेयांक देण्याच्या पद्धतीमध्ये समानता, या संदर्भातील प्रशासकीय अडचणी आणि वित्तीय प्रश्नांबाबत संबंधित घटकांशी चर्चा करून उपाययोजनांची शिफारस समितीकडून करण्यात येईल. या समितीचा कार्यकाळ 2023-24 च्या अखेरपर्यंत राहील.
नवीन शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी तीन टप्प्यांत प्रयत्न राहील. पहिल्या टप्प्यात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यासाठी प्राधान्य राहील. या धोरणातील अडचणी दूर करून, मार्गदर्शन व उपाययोजना केल्या जातील.
-डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू