पुणे -गोवर या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी राज्यात दोन टप्प्यामध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतला आहे. त्यानुसार लसीकरणाचा पहिला टप्पा पार झाला असून, दुसरा टप्पा जानेवारी महिन्यात होणार आहे. दरम्यान, 26 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गोवर आजाराबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार पहिला टप्पा दि. 15 ते 25 डिसेंबरदरम्यान पार पडला. त्यानुसार विशेष अभियानात गोवर रुबेलाचा एखादाही डोस चुकलेल्या 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील सर्व बालकांना चार आठवड्याच्या अंतराने गोवर रुबेलाचे दोन डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत 1 हजार 378 पथकांमार्फत 28 लाख 87 हजार 436 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये उद्रेकग्रस्त भागात गोवर रूबेलाचा अतिरिक्त डोस देण्यासाठी 4 लाख 71 हजार बालके असल्याचे आढळून आले. त्यानुसार 2 लाख 16 हजार 262 बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, 62 हजार 940 बालकांना लसीचा पहिला तर 61 हजार 527 बालकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. “व्हिटॅमिन ए’ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या 1 लाख 62 हजार 253 इतकी आहे. लसीकरणामुळे गोवर आजार टाळता येऊ शकतो, त्यामुळे पालकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 ते 25 जानेवारी 2023 मध्ये होणार आहे.