नवी दिल्ली – “पतीने स्वतःच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेवर पत्नीचाही सारखाच हक्क आहे. कारण घरगुती काम करून कौटुंबिक संपत्ती निर्माण करण्यात आणि खरेदी करण्यात तिने अप्रत्यक्षपणे हातभार लावला आहे,’ असे एका महत्त्वपूर्ण निकालात मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती कृष्णन रामासामी म्हणाले की, सध्या पत्नीच्या योगदानाला मान्यता देणारा कोणताही कायदा नसला तरी न्यायालय त्याला मान्यता देऊ शकते. न्यायमूर्तींना पत्नीचे योगदान मान्य करण्यापासूनही कायदा रोखत नाही. कन्नियान नायडू नावाच्या व्यक्तीने अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्याने सांगितले होते की, एक संपत्ती खरेदी करण्यासाठी त्याने पत्नीला पैसे पाठवले होते. मात्र तिला आता ती संपत्ती हडपायची आहे. तो परदेशात असल्याने तो स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकत नाही. त्यामुळे त्याने पत्नीच्या नावावर मालमत्ता विकत घेतल्याचे कन्नियाने न्यायालयाला सांगितले होते.
त्यानंतर “पती परदेशात असताना तिने कुटुंबाची काळजी घेतल्याने सर्व मालमत्तेवर तिचा समान हक्क आहे. यामुळे ती स्वतः काम करू शकली नाही. पतीच्या परदेश दौऱ्यासाठी तिने वडिलोपार्जित मालमत्ताही विकली होती. पतीच्या अनुपस्थितीत तिने टेलरिंग आणि शिकवणी करून पैसे कमवले,’ असे त्याची पत्नी कंसालाने न्यायालयात सांगितले आहे. तथापि, कनिष्ठ न्यायालयाने पतीचा दावा मान्य केला आणि त्याला मालमत्तेचा खरा मालक ठरवले. उच्च न्यायालयाने पती-पत्नी दोघांनाही संपत्तीचा समान हक्क असल्याचे सांगत हा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. पतीच्या नावावर खरेदी केलेल्या सर्व संपत्तीपैकी निम्म्या संपत्तीवर पत्नीचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कुटुंबाची काळजी घेणे ही आठ तास नव्हे चोवीस तासांची नोकरी आहे. त्यामुळे पतीने कमविलेल्या संपत्तीवर पत्नीचाही समान वाटा असतो.
– मद्रास उच्च न्यायालय, चेन्नई