नवी दिल्ली :- सीमेजवळ ताबा रेषेजवळ पाकिस्तान चीनच्या मदतीने संरक्षण सुविधा उभारत आहे. यामध्ये ड्रोन आणि लष्करी ड्रोन वापराच्या सुविधांचा समावेश आहे. याशिवाय कम्युनिकेशन टॉवर आणि भूमिगत केबलचे नेटवर्कदेखील उभे केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याची स्थिती अधिक बळकट करण्याच्या हेतून चीनकडून पाकिस्तानला ही मदत केली जात आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या रस्त्यांच्या कामांना आणि पाक व्याप्त काश्मीरमधील जलउर्जा प्रकल्पांना सुरक्षा मिळण्याच्या हेतूने देखील या पायाभूत सुविधा उभ्या करण्यास चीन पाकिस्तानला मदत करत आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सीमाभागामध्ये अलिकडेच ट्रकवर बसवलेल्या एसएच-15 या 155 एमएम हॉवित्झर तोफांचे ट्रक देखील “एलओसी’ जवळ काही ठिकाणी बघितले गेले होते. हे ट्रक एकच दिवस आगोदर पाकिस्तानमध्ये बघितले गेले होते.
सीमाभागात एसएच-15 हॉवित्झर तोफा तैनात करण्यासाठी पाकिस्तानने चीनच्या “नॉर्त िंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीबरोबर एक करार केला आहे. या तोफांचा पहिला हप्ता जानेवारी 2022 मध्ये पाकिस्तानला दिला गेला होता, असे लंडनमधील संरक्षण विषयक नियतकालिकाने म्हटले आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाक सीमेजवळ 2014 च्या सुमारास बघितले गेले होते. नंतर हे अधिकारी तरी दिसले नाहीत. पण चिनी सैनिक आणि इंजिनिअर “एलओसी’जवळ भूमिगत बंकरसारख्या संरक्षण सुविधा उभारताना बघितले गेले होते. लष्कराने या मुद्द्यावर अधिकृतपणे मौन बाळगले आहे, परंतु गुप्तचर संस्थांना सतत अपडेट केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.