“आरटीई’ प्रवेश प्रक्रियेचा घोळ संपेना

यंदा प्रथमच समिती करत आहे कागदपत्रांची पडताळणी
समिती सदस्यांना कायद्याची, कागदपत्रांची पूर्ण माहिती नसल्याने अडचणी

पिंपरी – आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन सुमारे एक महिना झाला आहे. अर्ज भरण्यापासून सुरू झालेला घोळ काही केल्या संपताना दिसत नाही. अर्ज भरुन झाल्यानंतरही पडताळणी प्रक्रियेतही अडचणी येऊ लागल्या असल्याने प्रवेश प्रक्रियेचा घोळ कधी संपणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आरटीई प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे पडताळणीसाठी यंदा प्रथमच शिक्षण विभागाने समितीची नेमणूक केली आहे. परंतु, या समितीत बहुतांश सदस्यांना आरटीई कायद्याची सखोल व परिपूर्ण माहिती नसल्याने कागदपत्रांची पडताळणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे, शिक्षण विभागाने समितीत तज्ञ व्यक्‍तींची नेमणूक करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

शहरातील पहिल्या टप्यातील प्रवेशासंबंधी पालकांना मोबाईलवरती प्रवेशाबाबत संदेश येत आहेत. आरटीई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणीचे कामकाज शिक्षण विभागाच्या शहरातील आकुर्डी व पिंपरी येथील दोन उन्नत केंद्रांमध्ये पडताळणी समितीकडून सुरु करण्यात आले आहे. समितीमध्ये तज्ञ व्यक्‍तींचा समावेश न करता आरटीई कायद्याबाबत अपुरी माहिती असणारे सदस्य नेमल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. कागदपत्रांची तपासणी करताना अनेकांचा गोंधळ उडत आहे.

अडचणीचे कारण आरटीई
पडताळणी समितीमध्ये बहुतेक सदस्य हे पालक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व इतर आहेत. या सदस्यांना अधिक माहिती नसल्याने माहिती असलेल्या शिक्षण विभागाच्या आणि शाळांच्या प्रतिनिधी सदस्यांवर अतिरिक्‍त भार आहेत. याचा थेट परिणाम आरटीई प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचेही पालक सांगत आहेत.

पालकांनीही दक्षता घ्यावी
शाळांनीही पालक मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असल्यास प्रवेश देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेकदा मुदत संपल्यानंतर पालक प्रवेशासाठी शाळा अथवा शिक्षण विभागात येऊन गोंधळ घालतात. तांत्रिक बाबीतून एखादा पाल्य वगळला गेल्यास पाल्याचे खूप मोठे नुकसान होते. पालकांनीही गोंधळून न जाता मुदतीत शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप
दरवर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश देताना शाळांकडून पालकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. तांत्रिक चुका काढून प्रवेश नाकारल्याचे आरोपही झाले होते. यामुळे, यंदा प्रथमच शिक्षण विभागाने कागदपत्रे पडताळणीसाठी समितीची स्थापना केली आहे. कागदपत्रे तपासणी केल्यानंतर पात्र पाल्याच्या अर्जासोबत प्रशासन अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र पालकांना दिले जाणार आहे. या पत्राची प्रत पालकांनी शाळेत दाखवून प्रवेश घ्यायचा आहे. शाळेने विद्यार्थ्यांची कागदपत्रे न तपासता केवळ अर्ज पाहून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.