पुणे -“प्रभात नारी सन्मान 2023′ च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात रंगत आणली ती “आशा दि व्हर्सेटाइल लिजंड’ कार्यक्रमाने. आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातील, देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगावर सुरमयी गारूड करणाऱ्या, लोकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आजपर्यंत गायलेल्या गाण्याची झलक, त्यांचा सांगीतिक प्रवास “प्रभा एन्टरप्रायजेस’ निर्मित या कार्यक्रमातून उलगडला.
आशाबाईंच्या आवाजातील जादू दाखवताना श्रुती देवस्थळी, संजना अरुण, श्रुती जोशी यांनी एकापेक्षा एक गाणी सादर केली. त्यांना मोहित थत्ते यांनी युगल गीतात साथ दिली. याशिवाय आशाबाईंनी गायलेली गाणी ज्या कलाकारांवर चित्रीत झाली, त्याचीही झलक ऋतुजा पवार, शर्वरी ढवळे, प्रसाद ओझरकर यांनी नृत्यातून सादर केली. याची कोरिओग्राफी ऐश्वर्या काळे यांनी केली होती. याचे स्क्रीप्ट डॉ. सुनील देवधर यांचे, तर संकल्पना आणि दिग्दर्शन शैलेश लेले यांचे होते.
एकापेक्षा एक मेलडी, यॉडलिंग गाणी, लावणी, बंगाली गाणी यावेळी सादर करण्यात आली. “तोरा मन दर्पण कहलाये’, “उडे जब जब जुल्फें तेरी’, “ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा’, “वो हसींन दर्द दे दो’, “कजरा मोहोब्बत वाला’, “मै बंगाली छोकरा’, “जाईये आप कहा जायेंगे’, “इना मीना डिका’, “अरे जारे हट नटखट’, “रात अकेली है’, “नजर लागी राजा तोरे बंगले पे’, “हाल कैसा है जनाब का’, “जमींसे हमे आसमॉं तक’, “झुमका गिरा रे’, “अभी ना जाओ छोडकर’ ही एकापेक्षा एक गाणी सादर करून गायक कलाकारांनी माहौल बनवला.
मध्यंतरानंतर रंगली ती “लावणी’! आशाबाईंनी गायलेल्या या लावण्या मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरल्या आहेत. यामध्ये बुगडी माझी सांडली ग, पतंग उडवित होते बाई मी, बाई माझी करंगळी मोडली या लावण्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. “रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी देखील प्रसिद्ध आहेच, मात्र या कार्यक्रमात बंगाली भाषेत ही लावणी गायकांनी सादर केली. याशिवाय “नही नही अभी नही, अभी ना जाओ छोडकर’ हे गीतही बंगाली भाषेतील सादर करण्यात आले.
“आजा आजा.. मै हूं प्यार तेरा, पिया तू अब तो आजा, तुमसे मिलके, ओ मारिया मुट्टी कोडी कव्वाडी हाडा, निशा।। अहाहा ही गाणी सादर करण्यात आली.
फिरता गळा असलेल्या आशाबाईंनी कव्वाली देखील गायली आहे. त्यांची “है अगर दुश्मन’ ही कव्वाली यावेळी सादर करण्यात आली. याशिवाय “रोज रोज डाली डाली’, “पिया बॉंवरी’, “मुझे नौ लखा मंगा दे रे’, “बादल में बिजली बार बार चमके’, “पर्वत से काली घटा टकराई’, “मन क्यों बहका रे बहका आधी रात को’ हे गाणे सादर करण्यात आले. यानंतर “कतरा कतरा मिलती है…’ या गाण्याने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.