ओझर – श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे पहाटे चार वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये महाआरतीचा मान गणेशभक्त विशालकुमार घुगे, शेखर बनकर, रमाकांत गर्जे, भालचंद्र कुलकर्णी, संतोष बेल्हेकर यांना मिळाला.
सकाळी साडेसात आणि दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी आठला नियमित पोथी वाचन करण्यात आले. त्याचबरोबर साडेदहा वाजता श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर तर्फे श्री विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व सोन्याचे अलंकार परिधान करण्यात येऊन श्री विघ्नहरासमोर स्वस्तिक फुलांची आरस करण्यात आली होती.
चंद्रोदयापर्यंत हभप सुशील महाराज जाधव (ओतूर) यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळाने दिली. आजचे अन्नदाते संतोष शांताराम कवडे, ओझर यांनी केले. रात्री साडेदहा वाजता शेजआरती झाली. भाविकांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, रंगनाथ रवळे, आनंदराव माडे, किशोर कवडे, मंगेश मांडे यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.