जुन्नर -महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले जुन्नर शहराजवळील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याचा रस्ता मात्र गेली दोन दिवस अंधारात आहे. तिथीनुसार शुक्रवारी (दि. 10) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काही प्रमाणात किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती; परंतु दत्त मंदिरापासून जुन्नर शहराजवळील छत्रपती कॉलेजपर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे अंधारात होता,
त्यामुळे रात्री किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना या अंधाराचा त्रास सहन करावा लागला. तसेच कुसूर या गावाकडे जाणारा हा रस्ता असल्याने व अनेकवेळा या रस्त्यावरून बिबट्यांचा वावर होत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. अनेकवेळा प्रशासनाशी संपर्क साधले असता त्या खांबावरच्या दिव्यांचे दुरुस्तीचे काम सुरू आहे, दोन-चार दिवसांमध्ये काम पूर्ण होईल, अशी उत्तरे देण्यात आली.
प्रशासनाने या गोष्टीची त्वरित दखल घेऊन ताबडतोब ते पथदिवे सुरू करावेत आणि कुसूर गावकऱ्यांची व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जुन्नर शहरी शहरवासीय व शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.