भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार

मदन भोसले; खंडाळ्यात महायुतीचा झंझावाती प्रचार दौरा

कवठे – माझ्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात सातारा जिल्ह्यातील पहिला सेज प्रकल्प खंडाळा तालुक्‍यातील केसुर्डी येथे आणला. इथल्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्यामुळे तालुक्‍यातील औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. परंतु, केसुर्डी आणि तालुक्‍यातील स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. अनेकांनी ही खंत मला बोलून दाखविली.

केसुर्डीसह तालुक्‍यातील तरूणांना प्रथम प्राधान्याने कायमस्वरूपी या औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांनी दिली.

केसुर्डी, नायगांव, जवळे, कवठे आदी गावातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. जिल्हा भाजपचे सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, खंडाळा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव, युवा नेते अनिरूद्ध गाढवे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल हाडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव जाधव-पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख आदेश जमदाडे, अंकुश पवार, प्रदीप माने, शेतकरी संघटनेचे प्रमोद जाधव, युवा नेते अतुल पवार, मनोज पवार यांची या दौऱ्यामध्ये प्रमुख उपस्थिती होती.

मदन भोसले पुढे म्हणाले, खंडाळा तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्यानंतर विविध उत्पादने घेणाऱ्या सुमारे 850 नामांकित कंपन्या खंडाळा तालुक्‍यामध्ये आल्या. या सर्व कंपन्यांमध्ये सुमारे 20 हजार कर्मचारी काम करतात. या कंपन्यांसाठी बऱ्याच कंपन्यांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या. मात्र, तालुक्‍यातील तरूणांना केवळ कंत्राटी कामगार म्हणून बोळवण केली जात आहे.

प्रचार दौऱ्यात अनेक गावातील तरूणांनी या कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्याने कायम स्वरूपी नोकऱ्या मिळण्याची मागणी केलेली आहे, याची जाणीव ठेऊन निवडणुकीनंतर माझ्या भूमिपुत्रांना कायम स्वरूपी रोजगार कसा मिळेल, या माध्यमातून त्यांची कौटुंबिक, आर्थिक प्रगती कशी होईल, या दृष्टीने पावले टाकली जातील, असा विश्‍वास मदन भोसले यांनी व्यक्त करून उद्याच्या निवडणुकीत सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि वाई विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले.

प्रचार दौऱ्यादरम्यान केसुर्डीचे सुर्यकांत चव्हाण, प्रदीप बांदल, सतिश कचरे, विश्‍वनाथ कांबळे, अमोल जाधव, दत्तात्रय यादव, सुनील ढमाळ, नायगावचे सरपंच सुधीर नेवसे, माजी सरपंच निखिल झगडे, ऍड. सुनिल नेवसे, संजय भोसले, शिवाजीराव भोसले, सौ. अनिता भोसले, शिवाजी काशीद, कांतीलाल सटाले, मच्छिंद्र पाटील, उदयसिंह भोसले, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, शामराव गायकवाड, राजेंद्र भोसले, विश्‍वास भोसले, गावातील ग्रामस्थ, महिला, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.