‘मी पाच जणांमध्ये माझ्या आईला जिवंत पाहू शकतो’

अवयवदानाने नवजीवन : नातेवाईकांनी दुःख बाजूला सारुन वाचविले इतरांचे प्राण

पिंपरी – “माझी आई अतिशय प्रेमळ होती, आई गेल्याचे दुःख आमच्या कुटुंबाला आहे. परंतु आईचे अवयव दान करून इतर पाच व्यक्तींमध्ये आईला जिवंत पाहू शकतो’ ही वाक्‍ये उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणविणाऱ्या ठरल्या. परंतु सोबतच त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एक-दोन नव्हे तर पाच जणांचे प्राण वाचत असल्याने आदरास्पद कौतुकही होते. अपघातात ब्रेन डेड झालेल्या एका 60 वर्षीय महिलेच्या अवयवदानने पाच रुग्णांना नवजीवन दिले.

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये रविवार, दि.13 ऑक्‍टोबर 2019 रोजी 60 वर्षीय रुग्ण महिलेचे मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. रुग्ण महिलेचा अपघात झाला होता व मेंदूला मार लागला होता. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

रुग्णाच्या नातेवाईकांनी यकृत, दोन मूत्रपिंड, दोन नेत्रपटल हे अवयवदान करण्याचा संकल्प केला. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र पुणे यांच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, दोन मूत्रपिंड हे अवयव डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथेच प्रत्यारोपण करण्यात आले. 61 वर्षीय पुरुष रुग्ण यकृत विकाराने ग्रस्त होते. या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण तर 47 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय स्त्री रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. जीवनदान देण्याची वेगवान किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी साधली.

अवयवदात्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी डॉ. यशराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉ. तुषार दिघे मूत्रपिंड तज्ञ्‌, डॉ. बिपीन विभुते यकृत विकार तज्ज्ञ, शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉ दिपाली काटे डॉ. आशिष चुग मज्जसंस्था शल्यचिकित्सक, डॉ रेणू मगदूम नेत्रविकार तज्ज्ञ विभाग प्रमुख, डॉ. स्मिता जोशी भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख यांचा सहभाग होता. डॉ. अमरजित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. जे. एस.भवाळकर अधिष्ठाता, डॉ. एच. एच. चव्हाण वैद्यकीय अधीक्षक यांचे या प्रक्रियेत योगदान लाभले.

8 कुटुंबांमुळे 20 रुग्णांना जीवनदान –
या वर्षभरात आठ रुग्णांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानच्या निर्णयामुळे एकूण 20 रुग्णांना जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. आतापर्यंत 9 यकृत, 67 मूत्रपिंड व 16 नेत्रपटल असे एकूण 92 अवयव हे डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)