संगमनेर – सामान्य नागरिकांबरोबरच अनेक राजकीय नेतेही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मुंबईतील कार्यालय गाठले असून, तेथील एक कर्मचारी करोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे ना. थोरात यांनी स्वतःला क्वारन्टाइन केले असून, त्यांच्यासह 20 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते.
महसूलमंत्र्यांच्या कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटर करोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे खबदरारीचा उपाय म्हणून ना. थोरात यांच्यासह 20 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे व ना. थोरात यांनी स्वतःला क्वारन्टाइन केल्याचे समजते.
संगमनेरात आज सकाळीच सय्यदबाबा चौकातील ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्यानंतर करोनाच्या विषाणूने शहराच्या मध्यवर्ती भागासह शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरातही शिरकाव केला. शहरातील पंजाबी कॉलनी परिसरातील एका साठ वर्षीय व्यावसायिकासह 45 वर्षांची महिला बाधित आढळली.
ढोलेवाडीतील एका 52 वर्षीय महिलेला करोनाचे संक्रमण झाले आहे. यातील ढोलेवाडीतील संक्रमित महिला नाशिकमध्ये, तर पंजाबी कॉलनीतील दोन्ही रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या तिघांचेही अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. तिघांची तालुक्याच्या रुग्ण संख्येत नव्याने भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 153 झाली आहे. आज बाधित आढळलेल्या व्यावसायिकासह त्याच परिसरातील महिलेचा कोणताही पूर्वेतिहास नसल्याने त्यांना कदाचित त्यांच्या व्यवसायातूनच संक्रमण झाले असेल, असा आरोग्य यंत्रणांचा अंदाज आहे.
या दोघांवरही संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासोबतच आज ढोलेवाडीतूनही एका 52 वर्षीय महिलेचा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. सध्या सदर महिलेवर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजही संगमनेरच्या रुग्णसंख्येत या तिघांच्या रूपाने नवीन भर पडल्याने तालुक्याच्या बाधित संख्येने दीड शतक ओलांडून 153 ही संख्या गाठली आहे.