पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच ऑक्सिजन बेड, रेमडेसिवरचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही माहिती मिळत नाहीत. यामुळे नेमकी मदत कोणाकडे मागावी, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांना पडत आहे. त्यामुळे ते थेट सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. त्यावरूनच मदतीसाठी आवाहन करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काहीवेळा मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे माणुसकीचे नाते आणखी घट्ट होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने ऑटो क्लस्टर, अण्णासाहेब मगर स्टेडिअम, घरकुल या ठिकाणी करोना बांधितांसाठी रुग्णालय आणि कोविड सेंटरची उभारणी केली आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी करोना बाधितांची संख्या पाहता ही व्यवस्थाही अपुरी पडत आहे.
याशिवाय लोणावळा आणि जुन्नरपासूनचे गंभीर रुग्णही पिंपरी चिंचवडमध्ये उपचारांसाठी येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची किंवा ऑक्सिजन नसल्याने रुग्णास दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करावे लागत आहे. याशिवाय डॉक्टरांनी जरी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना देण्यासाठी सांगितले असले तरी रुग्णांच्या नातेवाइकांना यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
यासोबतच रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने नातेवाइकांच्या चिंतेत आणखीच भर पडत आहे.
त्यामुळे गृहसंकुलातील सदस्य असो सामाजिक कार्यकर्ते किंवा नगरसेवक, कुटुंबीय मदतीची हाक देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू लागले आहेत.
ज्या रुग्णांना सेवा हवी आहे ते त्यासाठी सोशल मीडियावर असलेल्या ग्रुपमध्ये माहिती आणि मदतीचा संदेश टाकत आहेत. यातील काहींनाच मदतीचा हात मिळतो तर काही जणांच्या पदरी केवळ सल्ला आणि निराशाच पडते. काहीजण एखादी यादी सोशल मीडियावर टाकतात. मात्र त्यातील बहुतांश नंबर बंद किंवा बोगस असल्याचे दिसून येत आहे.
आमच्यासाठी प्रार्थना करा
एकीकडे मदतीसाठी सोशल मिडियाची मदत घेतली जात असताना दुसरीकडे मात्र अनेकजण आमच्या घरातील सर्वजण करोना बाधित असून अमुक एक व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशीही विनवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.