दिलहरावर तब्बल 8 वर्षांची बंदी

दुबई  -झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीकवर नुकतीच भ्रष्टाचारप्रकरणी 8 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटपटू मॅचफिक्‍सिंगमध्ये दोषी आढळला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहरा लोकुहितगे याच्यावरही आयसीसीने 8 वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाला लोकुहितगे दोषी आढळला आहे. दरम्यान, आयसीसीने यापूर्वीच 3 एप्रिल 2019 रोजी त्याचे निलंबन केले होते. यामुळे ही बंदी 3 एप्रिल 2019 पासून गृहित धरण्यात येणार आहे.

सुनावणी तसेच लेखी आणि तोंडी प्रतिवादानंतर लोकुहितगे दोषी आढळल्याचे निष्पन्न झाल्याचे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाने सांगितले. लोकुहितगे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियम 2.1.1, 2.1.4 आणि 2.4.4 मध्ये दोषी आढळला. लोकुहितगेने मॅचफिक्‍सिंग केली, तसेच समोर फिक्‍सिंग होत असताना त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबतची माहिती दिली नाही, असे लवादाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय लोकुहितगेवर एमिरट्‌स क्रिकेट बोर्डाकडूनही भ्रष्टाचारविरोधी नियम तोडल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. अमिराती क्रिकेट बोर्डाच्या टी-10 लीगमध्येही लोकुहितगेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
दिलहरा लोकुहितगेने आयसीसीच्या अनेक भ्रष्टाचारविरोधी शिक्षणाच्या सत्रांमध्ये भाग घेतला होता.

त्यामुळे त्याला आपण करत असलेल्या गोष्टी नियमाविरोधात आहेत हे माहिती होते, असे आयसीसीचे जनरल मॅनेजर ऍलेक्‍स मार्शल म्हणाले आहेत. लोकुहितगेवरचे आरोप गंभीर स्वरूपाचे होते. तसेच त्याने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केली नसल्याची प्रतिक्रिया मार्शल यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.