राजगुरुनगर -राजगुरुनगर नगरपरिषदेत 71 लाख 69 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. अपहार केलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व तो दाखल करण्यास विलंब करणाऱ्या मुख्याधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चार नगर सेवकांनी नगरपालिका संचनालय मुंबई, पुण्याचे विभागीय आयुक्त पुणे नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे केली आहे.
नगर परिषदेत नागरिकांकडून मालमत्ता कर व अन्य वसूल केलेल्या कराच्या रकमेपैकी 71 लाख, 69 हजार, 557 रुपये बॅंक खात्यात जमा न करता कर्मचाऱ्यांनी परस्पर हडप केल्याचा प्रकार राजगुरूनगर नगरपरिषदेत उघडकीस आला आहे. नगरपरिषदेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या विशेष लेखापरीक्षण अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. अपहाराची रक्कम यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षकाकडून नगरपरिषदेच्या पंचवार्षिक काळातील लेखापरीक्षण करण्यात आहे. लेखा परीक्षक नरेंद्र कणसे यांनी दिलेल्या अर्धसमास अहवालाद्वारे (पत्र) दिलेल्या माहितीनुसार सन2018-19 काळातील हा गैरव्यवहार समोर आला आहे.
गैरव्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक शंकर राक्षे, सचिन मधवे, राहुल आढारी व संपदा सांडभोर यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे अपहार करून पैसे भरणारे कर्मचारी नगरपरिषद विभागात त्याच ठिकाणी काम करीत आहेत. यावरही चार नगरसेवकांनी आक्षेप घेत दोषींना छुपा पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या या अफरातफरीची बाबत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी चौकशीची मागणी केली होती. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
याबाबत नगरसेवक शंकर राक्षे, सचिन माधवे यांनी सांगितले की, 29 जून 2019च्या सर्वधासारण सभेत अपहार झाल्याबाबत आम्ही मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिले होते. दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असून दोषी व्यक्तींना पाठीशी घालत आहेत. मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना नोटीस दिल्या आहेत. ऑडिट अहवाल पूर्णतः आला नाही. तो दाखल झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
-मच्छिंद्र घोलप,
मुख्याधिकारी राजगुरुनगर नगरपरिषद