उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवसच मिळणार
पुणे – लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल केल्यानंतर महिनाभर बंद असलेले टेमघर धरण दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स राखत धरण मजबुतीकरणाचे काम सुरू असून आता काम करण्यास अवघे 15 ते 20 दिवस मिळणार आहे. त्यामुळे मे महिना अखेरीस काम पूर्ण करण्याचे नियोजन करोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीचे काम वेगाने सुरू होते. मात्र, करोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने काम बंद ठेवण्यात आले होते. आता जलसंपदा विभागाला काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार धरण दुरुस्ती पुन्हा सुरुवात झाली आहे.
सध्या तिसऱ्या टप्प्यातील धरणाच्या भिंतीची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरण केले जात आहे. यामुळे धरणातील गळती थांबण्यास मदत होणार आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व साहित्य सामग्रीचा वापर करण्यात येत असून मोठया प्रमाणात धरणाची दुरुस्ती करण्याची देशात ही पहिलीच घटना आहे. या दुरुस्तीकडे केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्र (सीडब्लूपीआरएस) विशेष लक्ष देत असून, याकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. दुरुस्तीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग आणि ग्राऊटिंग पद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशांच्या कोनात ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडले जाते.
यानंतर या छिद्रामध्ये सिमेंत, सिलिका, फ्लॅशसोबतच दोन द्रवस्वरुपातील पदार्थ असे एकूण सहा पदार्थ्यांचे मिश्रण या छित्रामध्ये प्रेशरच्या सहाय्याने सोडले जाते. यामुळे गळती थांबण्यास मदत होते.
तिसऱ्या टप्प्यात अडथळे
धरण दुरुस्तीचा हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरण काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर तर लांबी 1,075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.