न्यूयॉर्क : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’चा ताबा घेतल्यानंतर मोठं मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अपेक्षेप्रमाणे एलॉन मस्क आठवडय़ाभरातच नोकरकपात सुरू झाली. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीवरून कमी करण्याबाबतचा ईमेल पाठवण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ७,५०० कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या, म्हणजे ३,७३८ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर काढण्यात येणार असून यात भारतीयांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
एक इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला. त्यात शुक्रवारपासून नोकरकपातीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचा उल्लेख आहे. कपातीची गरज का आहे, कपातीची प्रक्रिया नेमकी कशी असेल आदी उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कर्मचारी, यंत्रणा आणि माहितीच्या सुरक्षेसाठी ट्विटरने जगभरातील आपली सर्व कार्यालये बंद केली आहेत.
ट्विटरच्या नोकरकपातीचा भारताला सर्वाधिक फटका बसणार आहे. ‘ट्विटर इंडिया’मधील अनेकांना कपातीबाबत ईमेल आल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या कपातीमुळे भारतातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. नेमक्या किती कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, याचा तपशील हाती येण्यास काही काळ जावा लागेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ट्विटर किंवा ‘ट्विटर इंडिया’ने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ट्विटरच्या कर्मचारी कपातीच्या कथित निर्णयाविरोधात अमेरिकेमध्ये खटला दाखल झाला आहे. कर्मचाऱ्यांना सूचना न देता कामावरून कमी करणे हे केंद्रीय आणि कॅलिफोर्निया राज्याच्या नियमाविरोधात असल्याचा दावा करत मस्क यांच्याविरोधात सॅन फ्रान्सिस्को केंद्रीय न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार मोठय़ा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ६० महिन्यांची आगाऊ सूचना देणे बंधनकारक आहे.
’ट्विटरला सक्षम करण्यासाठी शुक्रवारपासून आपण जगभरात कर्मचारी कपात सुरू करत आहोत. कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी हे पाऊल आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया ईमेलद्वारे पूर्ण केली जाईल.
’‘ट्विटरमधील तुमची भूमिका’ या विषयांतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला ईमेल येईल. तुमची नोकरी कायम असेल, तर ट्विटरच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर हा मेल येईल. तुमची नोकरी जाणार असेल तर पुढील प्रक्रियेबाबत खासगी ईमेल पत्त्यावर सूचना पाठवली जाईल. ’कर्मचारी, यंत्रणा आणि वापरकर्त्यांच्या माहितीची सुरक्षा यासाठी जगभरातील कार्यालये बंद करण्यात आली आहेत. तुम्ही कार्यालयात किंवा वाटेत असाल, तर घरी परत जा. ’गोपनीय माहिती समाजमाध्यमे, माध्यमे किंवा अन्यत्र उघड न करण्याचे कंपनीचे धोरण पाळल्याबद्दल धन्यवाद. असे सांगण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.