निवडणुकीचं धुमशान सुरू मात्र कार्यकर्ते अन्‌ ग्रामस्थ पाणी, चारा यातच व्यस्त

दुष्काळी माणदेशाचा जगण्यासाठी संघर्ष

बिदाल: लोकसभेतील निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून उन्हाबरोबरच राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र माण तालुक्‍यात निवडणुकीचा जोर दिसत नसून पिण्याचे पाणी व जनावरांना चारा यामध्येच कार्यकर्ते व जनता गुंतल्याने निवडणूक असल्यासारखीही जाणवत नाही. ग्रामीण भागातील जनतेने ही निवडणूक मनावरचं घेतली नसल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणूक प्रचारात आघाडी, महायुती व वंचित आघाडीच्या उमेदवारांचे व त्यांच्या कार्यकर्यांची धावपळ सुरू आहे. तालुक्‍यात आ. जयकुमार गोरे गटाचा दबदबा जास्त आहे. अनिल देसाई, शेखर गोरे हे गटही तालुक्‍यात भक्कम आहेत. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हे त्या गटप्रमुखांच्या संपर्कात असून त्यांना आपलेसे केल्याशिवाय जनतेचा पाठिंबा मिळत नाही, हे त्यांनी जाणले आहे. सुरुवातीला दुरंगी वाटणारी निवडणूक आता तिरंगी व अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले असून संजय शिंदे यांनी दहिवडी व वडूज शहरात मोठी गर्दी जमवून प्रचार सभा घेत सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

त्यानंतर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनीही डॉ. दिलीप येळगावर, रणजित मोहिते, शहाजी पाटील, अनिल देसाई यांना सोबतीने तालुक्‍यातील ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार ऍड. विजय मोरे यांनीदेखील प्रचारमध्ये आघाडी घेतली आहे. प्रहार संघटनेचे उमेदवार सचिन पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या भेटी मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय आघाडीचे उमेदवार रामचंद्र घुटूकटे यांनी युवा मतदारकडे लक्ष केंद्रित केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरेनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने यांच्या निर्णयाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकरही सक्रिय झाले आहेत. परंतु, सर्व नेतेमंडळींच्या निवडणुकीच्या धुमशानाला सुरुवात झाली असली तरी माणदेशी जनता मात्र, दुष्काळामुळे पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा उपलब्ध कसा करायचा, या विवंचतनेत आहे. त्यामुळे प्रचार करणाऱ्या नेतेमंडळींना या भागातील अद्याप न सुटलेल्या दुष्काळाच्या मुख्य समस्येवर लक्ष केंद्रित करून जनतेसाठी ठोस आश्‍वासने देण्याची गरज आहे.

उमेदवार प्रचारात एकमेकांवर टीका करत असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न, सध्याची दुष्काळी परिस्थिती असताना देखील जनावरांना चारा पाणी याविषयी कोणत्याही उमेदवाराने आपल्या भाषणात किंवा वैयक्तिक भेटीत चर्चा करताना दिसले नाहीत की जनतेच्या अडचणींची विचारपूस केली नाही, जो तो मला निवडून येण्यासाठी काय करावे लागेल याचाच कानोसा घेत असल्याने शेतकरी वर्ग निवडणुकीविषयी उदासीन दिसून येत असून सामान्य जनतेची वादळापूर्वीची शांतता कोणाला फटका देणार हे सांगणे मुश्‍किल आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.