टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना धक्काबुक्की

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे  कामकाज आटोपून निघालेले कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य अधिकार्‍यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की झाली आहे.सोमवारी रात्री साडेअकरा वाजता किणी टोल नाक्यावर ही घटना घडली. याप्रकरणी टोल कर्मचारी विजय शामराव शेवडे (रा. घुणकी, ता. हातकणंगले) यासह एका अनोळखी कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल आणि त्यांचे सहकारी अधिकारी इस्लामपूर इथल्या निवडणुकीच्या कामकाजानिमित्त गेले होते. रात्री उशिरा ते इनोव्हा या शासकीय गाडीतून कोल्हापूरकडे येत होते. यावेळी किणी टोल नाक्याच्या लेन क्रमांक 7 मध्ये गाडी टोल कर्मचार्‍याने अडविली आणि कर्मचारी विजय शेवडे याने टोल देण्याची मागणी केली.

गाडीत पुढच्या सीटवर बसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, “ही गाडी शासनाची असून, आम्ही सर्वजण शासकीय अधिकारी आहोत”. मात्र, शेवडे याने आपले आयकार्ड दाखवा, असे सांगितले. आयकार्ड पाहून हे चालत नाही, असे जुजबी उत्तर देऊन टोल भरावा लागेल, असा अट्टाहास त्याने धरला. यावेळी मित्तल यांना या टोल नाक्याच्या मॅनेजरनेही हे आयकार्ड चालत नसल्याचे सांगितले.

दरम्यान, मित्तल यांनी मॅनेजरचे आयकार्ड पहिले. ते कार्ड मुदतीच्या बाहेर गेल्याचे निदर्शनास आणून दिल्याने नाक्यावरील कर्मचारी संतप्‍त झाले. आम्ही तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ शकतो, असे म्हणून त्यांनी मित्तल यांना शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की केली.

याप्रकरणी मित्तल व त्यांच्या सहकार्‍यांनी वडगाव पोलिस ठाणे गाठले. जि.प.चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल केशव कदम यांनी टोल व्यवस्थापन आणि लेन क्रमांक 7 वरील कर्मचारी शेवडे यांच्यासह एका अनोळखी कर्मचार्‍याविरुद्ध फिर्याद दिली आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांनी संशयित आरोपी यांच्यावर भा.दं.वि.सं.क. 353,  341, 323, 504, 34 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या साथीदाराच्या पोलीस शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.