इस्लामाबाद – इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने काढून घेतले आहे. पीटीआय पक्षाने घेतलेल्या पक्षांतर्गत निवडणूका आयोगाने फेटाळून लावल्या आणि ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे क्रिकेटची बॅट हे चिन्ह काढून घेतले आहे.
पीटीआय पक्षाच्या अंतर्गत निवडणूका २ डिसेंबर रोजी पेशावरमध्ये झाल्या होत्या. मात्र पक्षातील काही सदस्यांनी या निवडणुकांना आक्षेप घेणाऱ्या याचिका निवडणूक आयोगापुढे सादर केल्या होत्या. या याचिकांवर आयोगाच्या ५ सदस्यीय पॅनेलने सुनावणी केल्यावर यावरील निर्णय सोमवारी राखून ठेवला होता. हा निकाल काल (शुक्रवारी) जाहीर करण्यात आला.
या निवडणुका पक्षाच्या घटनेनुसार घेण्यात आल्या नाहीत, असे सांगून पक्षाला क्रिकेट बॅट हे निवडणूक चिन्ह वापरता येऊ शकणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. पक्षांतर्गत निवडणुकीद्वारे इम्रान खान यांचे निकटवर्तीय गौहर खान यांना पक्षाचे अध्यक्ष निवडण्यात आले होते. मात्र आयोगाच्या निकालानुसार त्यांना हे पद गमवावे लागणार आहे.
इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे क्रिकेटची बॅट हे चिन्ह त्यांची ही ओळख सार्थ करत होते. सध्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला पीटीआय पक्षाच्यावतीने एकतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, किंवा आपल्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अन्य पक्षाच्या चिन्हाच्या आधारे निवडणूक लढवण्यास सांगितले देखील जाऊ शकते.
पीटीआयचे एक नेते अहमद एस अकबर यांनी पक्षांतर्गत निवडणुकांना आव्हान दिले होते. निवडीच्या नावाखाली पक्षाने नियुक्ती प्रक्रीया राबवल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांनी या आव्हान याचिकेवरील युक्तीवाद ऐकून सुनावणी घेतली होती.