Election Result 2023 : हिंदी भाषिक राज्यांतील निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने परिणाम केल्याचे मानले जात आहे. मोदी मॅजिकच्या चलतीने त्या पट्ट्यात भाजप जोमात असल्याचे दिसून आले. त्याउलट, तो फॅक्टर हिंदी भाषिक राज्यांत गतवैभव मिळवण्याचे कॉंग्रेसचे स्वप्न भंग करण्यास कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देण्याचे टाळून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची रणनीती भाजपने अवलंबली. त्या पक्षाने केंद्रातील मोदी सरकारचे कार्य आणि मोदींच्या गॅरंटींवर भर दिला. पक्षाच्या प्रमुख नेत्यांप्रमाणेच स्वत: मोदी यांनी झंझावाती प्रचार दौरे केले.
मोदींनी मध्यप्रदेश आणि राजस्थानात प्रत्येकी १४, छत्तिसगढमध्ये ५ सभा घेतल्या. त्याशिवाय, त्यांचे रोड शोही झाले. साहजिकच, भाजपला मिळालेल्या यशाचे मोठे श्रेय त्या पक्षाकडून मोदींना दिले जात आहे.
विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या दणदणीत यशामुळे भाजप आगामी लोकसभा निवडणुकीला अधिक जोमाने आणि उत्साहाने सामोरा जाईल. अर्थात, तेलंगणातील निकाल त्या पक्षाला काहीशा चिंतेत टाकणारा आहे.
उत्तरेकडील राज्यांत मोठा बोलबाला असलेल्या भाजपला दक्षिणेकडील राज्यांत अद्यापही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. तेलंगणाने त्याबाबीवर शिक्कामोर्तब केले.