मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.
दरम्यान, अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपची ताकद पणाला लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. रमेश लटके यांचे अकाली निधन झाल्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे.
पक्षात बंड करून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेत भाजपोसबत युती करुन सत्ता स्थापन केली. तेंव्हापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून खरी शिवसेना आमचीच असा दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत आहे. दोन्ही गट नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही शक्तीप्रदर्शन करताना दिसले. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांची ताकद पणाला लागणार आहे.