नवी दिल्ली – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासाठीच्या नागरी सर्वेक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत तयार होत असलेला प्रभावी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल असे ते म्हणाले.
जागतिक दृष्टीकोन बाळगतानाच देशाच्या संस्कृतीची मूळे देखील भक्कम करण्यासाठी, शिक्षण क्षेत्राला वसाहतवादाच्या सावटातून मुक्त करण्यासाठी आणि आपल्या पुढल्या पिढीत अभिमानाची भावना रुजवण्यासाठी गतीशील, प्रभावी, सर्वसमावेशक आणि भविष्याचा वेध घेणारा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा महत्वाचा असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्याची रूपरेषा ठरवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन सार्वजनिक सल्ला- सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेच्या सूचना मागवल्या आहेत.
I appeal to all citizens to participate in the Citizen Survey for NCF for developing #NayeBharatKaNayaCurriculum.
A dynamic National Curriculum Framework in line with the NEP 2020 will play a major role in achieving the goal of Viksit Bharat.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) August 16, 2022
दरम्यान, भारत सरकारने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 घोषित केले असून, ते राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) विकसित करून, त्याद्वारे शिक्षण प्रणालीचा दर्जा सुधारण्याची शिफारस करते. जिल्हा सल्ला समित्या, राज्य फोकस ग्रुप आणि राज्य सुकाणू समित्या, राष्ट्रीय फोकस ग्रुप आणि राष्ट्रीय सुकाणू समित्या गठित करून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे काम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया कागद विरहित करण्यासाठी वेबसाइट आणि मोबाईल अॅप तंत्रज्ञानाचे व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे.