मुंबई – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केंद्रीय यंत्रणांद्वारे करण्याची मागणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. हे वृत्त ताजे असतानाचा आता अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करत जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराची आधीच न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.
बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आली होती. माजी मंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. अखेरीस थकीत कर्जामुळे कारखाना लिलावात काढला होता. खुद्द शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. त्यावेळी ज्या कंपनीने हा कारखाना खरेदी केली त्या कंपनीची उलाढाल एक कोटीहून कमी होती.
दरम्यान संबंधीत कंपनीने हा कारखाना ६० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.