– हिमांशू
करोना काळातील सरकारी कॉलरट्यून हा परमोच्च वैताग आहे. पूर्वी अमिताभ बच्चन यांची कॉलरट्यून वाजत असे. त्याहीपूर्वी एका महिलेच्या आवाजात सूचना देण्यात येत असत. आताही पुन्हा एक महिला आपल्याला लसीकरणासंबंधी बरंच काही ऐकवते. ही कॉलरट्यून लांबीलाही प्रचंड मोठी आहे.
वस्तुतः ही कॉलरट्यूनच नव्हे. कारण आपण ज्याला फोन लावतो, त्याची रिंग वाजत असताना आपल्याला जी ऐकू येते तिला आपण कॉलरट्यून म्हणतो. परंतु लसीकरणाची कॉलरट्यून मात्र पलीकडचा फोन बिझी असला तरी वाजत राहते आणि पूर्ण टेप संपल्यावर आपल्याला कळतं, की समोरच्या व्यक्तीचा फोन बिझी आहे किंवा बंद आहे. कॉलरट्यूनची लांबी किती ठेवली म्हणजे लोक वैतागणार नाहीत, यावर संबंधित विभागाने एकदा अभ्यास केलाच पाहिजे. शिवाय, कॉलरट्यूनमध्ये व्हरायटी देता येते का, याचाही आवर्जून विचार केला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी एका जवानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या कॉलरट्यूनला तो वैतागला होता. खरं तर बच्चन साहेबांचा भरभक्कम आवाज ही ऐकत राहण्याची गोष्ट आहे; परंतु जवान चिडला होता तो त्यातल्या कन्टेन्टवर! जे स्वतः पॉझिटिव्ह झाले, ज्यांच्या घरातले सगळे लोक पॉझिटिव्ह झाले, त्यांनी हे ज्ञान का पाजळावं, असा त्याचा सवाल होता आणि बऱ्याच जणांना तो रास्तही वाटला होता.
अमिताभ बच्चन इंग्रजी आणि हिंदीतून करोना काळात कसं वागायचं, काय नियम पाळायचे हे उत्तमरीत्या सांगत होते. परंतु ऐकणाऱ्याचे कान पकतील इतके दिवस कोणतीच गोष्ट त्याला सलग ऐकवणं चूक आहे. लसीकरणाची टेप तर खूपच लांबलचक आहे, हे कुणीही मान्य करेल. परंतु लसीसाठी गर्दी होत असताना आणि लसीकरण केंद्रं बंद होत असताना (आणि मुख्य म्हणजे “ज्याचा असेल वशिला, त्यानेच जावे लशीला’ असे मेसेज फॉरवर्ड केले जात असताना) ही कॉलरट्यून वाजवणं कितपत संयुक्तिक आहे, याचा विचार झालाच पाहिजे.
खुद्द दिल्ली उच्च न्यायालयानेच सरकारला हा सवाल विचारला. “सध्या तुमच्याकडे लोकांना द्यायला पुरेशा लशी नाहीत; पण एखाद्याने दुसऱ्याला फोन केला तर लसीकरणाची कंटाळवाणी ट्यून ऐकावी लागते,’ हे थेट न्यायालयानं म्हटलंय. “2021 साल आपल्यासाठी आशेचा किरण घेऊन आलंय,’ अशा शब्दांनी ही कॉलरट्यून सुरू होते आणि भारतात तयार झालेली लस प्रभावी आणि सुरक्षित कशी आहे, ती आपल्याला करोनाशी लढण्याची प्रतिकारक्षमता कशी देते, अशा अनेक गोष्टी सांगून अखेर नंबर आल्यावर लस घेण्याचा सल्ला दिला जातो. पण नंबरच लागत नसेल तर रोजरोज तीच ती कॉलरट्यून का ऐकायची?
“लोकप्रिय व्यक्तीनं समजावून सांगितलं तर लोकांना पटतं,’ हे कोर्टानंही मान्य केलंय; पण अतिरेक कधीही वाईटच! खरं तर सगळे कलावंत सध्या काम नसल्यामुळे घरीच बसलेत. त्यामुळे किमान अनेक आवाज आलटून-पालटून वापरायला काय हरकत आहे? नाहीतरी कुठला सेलिब्रिटी कुणासाठी ट्विट करतो, यावर सतत चर्चा होतच असतात. पण सेलिब्रिटींना ट्विटपेक्षा कॉलरट्यूनमध्ये बिझी ठेवलं तर…? संगीतकारांकडून श्रवणीय गीतपंक्तीही बनवता येतील. पण रुक्षपणातच गंमत वाटत असेल, तर काय करणार?