उडत्या तबकडीतून टाकलेली कागदपत्रें!
तोलोसी, ता. 14 – उडत्या तबकड्यांतून येणाऱ्या व्यक्तींनी काही कागदपत्रे टाकलेली आढळून आल्याचे कळते. जीन मार्टी नावाच्या एका 42 वर्षांच्या मेकॅनिकला ही कागदपत्रें सापडली आहेत. सदर मेकॅनिकने रात्रीच्या वेळी ही तबकडी एका शेतात उतरलेली पाहिली. तो तेथे गेला पण नंतर त्याला यंत्रं वगैरे काही दिसले नाही. काही कागदपत्रे मात्र सापडले.
हे कागद परक्या भाषेतील दिसले. एखाद्या पुस्तकांतून फाडल्याप्रमाणे काही पाने पडली होती. मार्टीने कागद पोलिसांकडे नेले. परीक्षा करता ते अनामी भाषेत लिहिल्याचे आढळले व व्हिटनाम व व्हिटमिन्ह यांच्या संबंधीचे प्रश्न त्यात चर्चिले होते. त्यांची छायाचित्रे घेऊन ते लष्करी अधिकाऱ्यांचे स्वाधीन करण्यात आले. आता अधिक चौकशी होईल.
उडत्या तबकड्यांवर अधिक प्रकाश
मुंबई, ता. 14 – उडत्या तबकड्यांचे प्रकरणी अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. येथील एक तरुण इंजिनियर सुकुमारन यांनी काल रात्री ही तबकडी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली नि खालील हकीगत निवेदन केली. ते आपल्या दोन मित्रांसमवेत विलेपार्ले भागात फिरत असताना त्यांना ही तबकडी आकाशातून जाताना दिसली.
ते म्हणाले, ही तबकडी वर्तुळाकार असून स्वतःभोवती फिरत वेगाने जाते. ती प्रकाशमान असते व मोठ्या ताऱ्यासारखी दिसते. आमच्या भागांतील अनेक लोकांनी ती पाहिल्याचे सांगितले. येथील वेधशाळेने या तबकड्याचे दर्शन पुनः झाले तर लगेच बातमी देण्याची सूचना केली आहे.
जागतिक बॅंकेचे पाकिस्तानला दूषण
कराची, ता. 14 – भारत-पाकिस्तान यांच्यातील कालव्याच्या पाण्याच्या तंट्याबाबत जागतिक बॅंकने सुचविलेली योजना हीच सर्वोत्तम योजना होती व आता तंटा सोडविण्यासाठी दुसरी योजना आम्ही सुचवू शकू असे वाटत नाही, असे जागतिक बॅंकेचे उपाध्यक्ष रॉबर्ट गार्नर यांनी येथे पत्रकारांना मुलाखत देताना सांगितले.
ते म्हणाले, “पाकिस्तानकडे जाणारे पाणी वळवून आपल्याकडे घेण्याची एकतर्फी कारवाई भारताने केलेली नाही अशी जागतिक बॅंकेची खात्री पटली असून पाकिस्तानने मात्र आमची योजना अमान्य केल्याबद्दल आम्हाला खेद होत आहे’.