अग्रलेख : इम्रान खान अडचणीत!

जगात सर्वत्रच करोनाच्या महामारीचा धुमाकूळ सुरू असतानाच पाकिस्तानही त्याला अपवाद नाही; पण जगातील सर्व देशांचे प्रमुख या महामारीचा मुकाबला करण्यासाठी लक्ष केंद्रित करत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मात्र आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता इम्रान खान चांगलेच अडचणीत आले आहेत.

क्रिकेटच्या मैदानावर अनेक विजय मिळवणारे इम्रान खान राजकारणाच्या मैदानावर विशेषत: पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर मात्र पराजित होताना दिसत आहेत. मुळात काही वर्षांपूर्वी जेव्हा पाकिस्तानमध्ये निवडणूक झाली आणि इम्रान खान यांच्या पक्षाला यश मिळाले तेव्हा अन्य कोणताही राजकीय पर्याय उपलब्ध नसल्याने इम्रान खान पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. पाकिस्तानच्या राजकारणाची दिशा ठरविणारे पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संघटना यांच्या हातचे बाहुले म्हणून काम करण्यासाठीच जणूकाही इम्रान खान यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले होते. आता तर पाकिस्तानमधील विविध राजकीय पक्ष इम्रान खान यांच्या विरोधात एकत्र आले आहेत आणि दुसरीकडे दहशतवाद विरुद्ध लढणाऱ्या “साथ’ या आशियाई संघटनेनेही इम्रान खान यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

पाकिस्तानमधील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटच्या व्यासपीठावर 16 ऑक्‍टोबरला इम्रान खान यांच्या विरोधात तीव्र राजकीय आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या नवाज गटाच्या नेत्या मरियम नवाज यांनीही इम्रान खान यांचे सरकार कायदेशीर नसल्याने सांगून येत्या जानेवारीपूर्वी हे सरकार कोसळेल आणि इम्रान खान घरी जातील, असे वक्‍तव्य केले आहे. इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी राजकीय पक्षांनी अशाप्रकारे आघाडी उघडली असतानाच दुसरीकडे साथसारख्या संघटनेने थेट इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल केल्याने इम्रान यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुले असून या लष्कराच्या प्रभावामुळेच पाकिस्तानचे शेजारी राष्ट्रांशी शत्रुत्व निर्माण झाल्याची टीका साथ या संघटनेने आपल्या अधिवेशनात केली आहे. या संघटनेने व्यक्‍त केलेल्या या मताला महत्त्व यासाठीच आहे की, ही संघटना पाकिस्तानमधील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. अनेक राजकीय नेते, पत्रकार, सोशल मीडियाचे कार्यकर्ते, नागरी संघटनांचे कार्यकर्ते यांचा सहभाग असलेल्या या संघटनेकडे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी नेहमीच वक्रदृष्टीने पाहिले आहे. त्यामुळे अनेकांना देश सोडून परदेशी आश्रय घ्यावा लागला आहे.

पाकिस्तानच्या राजकारणाच्या विरोधात नेहमीच भूमिका घेणाऱ्या या संघटनेच्या बैठका होऊ नयेत यासाठी पाकिस्तानची आयएसआय आणि इतर सुरक्षा संघटना नेहमीच अडथळे आणत असल्याची बाबही मध्यंतरी समोर आली होती. त्यामुळे सध्या करोना महामारीच्या काळात या संघटनेने आपली पाचवी वार्षिक बैठक ऑनलाइन घेतली आणि या बैठकीत सर्वांनीच पाकिस्तानच्या राज्यकारभारावर आणि लष्कराच्या प्रभावावर ताशेरे ओढले.

पाकिस्तानकडून दहशतवादाला घातले जाणारे खतपाणी, अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि लोकशाहीचा अभाव या सर्व गोष्टींवर या बैठकीत चर्चा होऊन इम्रान खान यांच्यावर टीका करण्यात आल्याने लोकशाही मार्गाने निवडून आलेले इम्रान खान आता तरी जागे होऊन लष्कराच्या प्रभावातून बाजूला होतील, अशी अशा करावी लागेल. अर्थात, पाकिस्तानमधील आतापर्यंतचा अनुभव पाहता पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर बसणाऱ्या व्यक्‍तीला नेहमीच भारत द्वेषाचा आणि लष्कराच्या सहकार्याचा आधार घ्यावा लागतो. भारताचा द्वेष केल्याशिवाय आपण पाकिस्तानात यशस्वी होऊ शकत नाही हे गृहीत धरूनच पाकिस्तानचे राज्यकर्ते सिंहासनावर बसतात.

पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा हा भारतद्वेष वाढवण्याचे काम पाकिस्तानचे लष्कर विशेषत: आयएसआय ही गुप्तचर संघटना करते, हेसुद्धा लपून राहिलेले नाही. जगातील बहुतेक सर्व देशांनी आणि युनोसारख्या संघटनेनेही पाकिस्तानला अनेक वेळा तंबी देऊनही पाकिस्तानच्या वागणुकीत कोणताही फरक पडलेला दिसत नाही. कारण साथ या संघटनेने म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लष्कराच्या हातचे बाहुले असल्यामुळे लष्कर म्हणेल त्याप्रमाणे त्यांना काम करावे लागते. भारताविरुद्ध किंवा इतर देशांमध्येही कार्यरत असणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी लष्कराचे आणि आयएसआय संघटना यांचे पाठबळ असते हे उघड आहे.

आयएसआयच्या माध्यमातूनच पाकव्याप्त काश्‍मीर आणि इतरत्र दहशतवादाची प्रशिक्षण केंद्रे चालविली जातात ही गोष्ट इम्रान खान यांना माहीत नसेल, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल, पण पाकिस्तानी लष्कराला किंवा आयएसआयला विरोध केला, तर आपली खुर्ची जाऊ शकते याची भीती असल्यानेच इम्रान खान कोणताही विरोध करू शकत नाहीत. साहजिकच पाकिस्तानात लोकशाही फक्‍त नावापुरतीच राहिलेली आहे. सर्वच पातळीवर इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरत असल्याने विरोधी पक्षांना आता एकत्र यावे लागले आहे.

सध्याचे वातावरण संपूर्णपणे इम्रान खान यांच्या विरोधात आहे. लष्कराच्या प्रभावातून बाजूला होऊन खऱ्या अर्थाने पंतप्रधान म्हणून लोकशाही कारभार चालवण्यासाठी खान यांना येत्या काही काळामध्ये मोठ्याप्रमाणावर परिश्रम करावे लागणार आहेत. त्याचेच संकेत गेल्या काही दिवसांतील या घडामोडींनी दिले आहे. येत्या जानेवारी महिन्यापूर्वी इम्रान खान घरी जातील हे मरियम नवाज यांचे भाकित जर खरे ठरायचे नसेल तर इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून आपली लोकशाही जबाबदारी ओळखूनच कार्यरत राहावे लागेल.

पाकिस्तानची लोकशाही आणि तेथील लष्करशाही यांना एकमेकांपासून बाजूला ठेवणे आतापर्यंत कोणत्याही पाकिस्तानी राज्यकर्त्यांना शक्‍य झाले नसले, तरी तो प्रयत्न इम्रान खान यांना जाणीवपूर्वक करावा लागेल. अन्यथा येत्या काही दिवसांत त्यांच्याविरुद्धचे वातावरण अधिक तीव्र होण्याचा धोका त्यांनी लक्षात घ्यायला हवा. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.