सुस्थिर विश्वशांतीबाबत रशियाचे आश्वासक-पत्रक
मॉस्को, ता. 24 – या पृथ्वीतलावरील सुस्थिर शांततेसंबंधी आश्वासन देणारे एक पत्रक रशियन वृत्तसंस्था टासने काल प्रसिद्ध केले आहे.
या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, शांतता सुस्थिर करण्याची भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा बड्या राष्ट्रात समझोता निर्माण झाला पाहिजे हे गृहितच धरले पाहिजे. सध्याची अण्वस्त्र स्पर्धा थांबली पाहिजे हेही ओघाने येतेच. या राष्ट्रांत स्नेहसंबंध टिकविण्याची आवश्यकता असते. अलीकडे भरलेल्या नाटो परिषदेत जे निर्णय घेण्यात आले त्यामुळे शीत युद्ध थांबवण्याची शक्यता नाही, असेही भाष्य या पत्रकात करण्यात आले आहे.
जर्मन प्रश्नाशी युरोपीय सुरक्षेचा प्रश्न जोडण्यास “नाटो’वाले तयार नाहीत. तसे असेल आणि केवळ युरोपातील सुरक्षेसंबंधीच चर्चा करण्याची त्यांची तयारी असेल तर हरकत नाही. त्यामुळे सर्व राष्ट्रांचे हितसंबंधाबाबत फलदायी वाटाघाटी करण्याची शक्यता निर्माण होईल अशी आशा व्यक्त करून रशिया आपल्या धोरणाप्रमाणे शीतयुद्ध थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न करील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
पाकिटावर हात मारीत असताना महिला पोलिसाकरवी चतुर्भुज
पुणे – पुण्यातील महिला पोलीस दलात नोकरी करणाऱ्या श्रीमती उषा गुहागरकर यांनी आज मोठी बहादुरी केली! भवानी पेठेत राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास त्यांनी पकडले.
श्रीमती गुहागरकर आज सकाळी हेडक्वार्टर्सकडून एक नंबरच्या बसने येत होत्या. त्याच बसमध्ये देहुरोड येथील अब्दुल हकीम नावाचा इसम बसला होता. त्याच्या खिशातील 70 रुपये असलेले पाकीट लांबवीत असतानाच त्यांनी गुन्हेगाराला पकडले.
नेपाळची नवी घटना
काठमांडू – नेपाळच्या घटना मसुद्यांवर मंत्रिमंडळात चर्चा चालू आहे असे मंत्रिमंडळाच्या मंत्रालयातून निघालेल्या पत्रकात म्हटले आहे. नेपाळला योग्य अशा घटनेचा मसुदा राजे महेंद्र यांना सादर करण्यात आला आहे. घटना तयार झाल्यानंतर शिक्कामोर्तब करण्यासाठी पाठविली जाईल.
मद्रास सरकार दोन लाख टन तांदूळ खरीदणार
मद्रास – येत्या भाताच्या हंगामात दोन लाख टन तांदूळ खरेदी करावयाचा असे मद्रास सरकारने ठरविले आहे. कापणीचा हंगाम 15 जानेवारीपासून सुरू होतो.