62 वर्षांपूर्वी प्रभात : “घडीची’ मोटारसायकल

ता. 24, माहे फेब्रुवारी, सन 1959

सूर्यशक्‍तीवर चालणारी पाणचक्‍की

मॉस्को, ता. 23 – सोव्हिएत शास्त्रज्ञ प्रेस्निआकोब यांनी सूर्यकिरणांवर चालणाऱ्या पाणचक्‍कीचा शोध लावला आहे. सूर्यकिरणांची शक्‍ती या शोधामुळे ताबडतोब चाके फिरविण्याच्या वगैरे कामासाठी वापरली जाते. त्यातील उष्णतेचा उपयोग करून नवी यांत्रिक शक्‍ती निर्माण केली जाते. या नव्या पाणचक्‍कीत “मॅग्नेटिक थर्मल इंजिन’च्या मदतीने काम केले जाते. सूर्यकिरणाखेरीज दुसरी कोणतीही शक्‍ती लागत नसल्याने ही नवी पाणचक्‍की अत्यंत कमी खर्चाची आहे.

बड्या राष्ट्रांचे आंधळे अनुकरण

लखनौ – आमचे सरकार देशाची आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी मोठ्या योजनांवर पैशांची उधळपट्टी करून रशिया-अमेरिकेचे आंधळे अनुकरण करीत आहे, अशी टीका उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी नेते राज नारायण यांनी केली. विधानसभेत नव्या अंदाज पत्रकावर चर्चा चालू आहे. राज नारायण म्हणाले, या देशातील जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. दारिद्य्राने ते हैराण झाले आहेत; तेव्हा औद्योगिकीकरणाची भव्य स्वप्ने त्यांच्यापुढे ठेवण्यात अर्थ नाही. तो आत्मघात ठरेल.

औषधांची आयात भारतात लवकरच बंद होणार

नवी दिल्ली – तिसऱ्या पंचवार्षिक योजनेअखेर औषधी व औषधे याबाबत भारत स्वयंपूर्ण होईल अशी आशा असल्याचे उद्योगमंत्री मनुभाई शहा यांनी आज लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, औषधी आणि औषधे यांची आयात हळूहळू कमी होत आहे. तिसऱ्या योजनेच्या दुसऱ्या वर्षाअखेर औषधांची आयात बहुतेक बंद होईल.

“घडीची’ मोटारसायकल

मॉस्को – केवळ सुमारे वीस शेर (20 किलोग्रॅम) वजनाची आणि सुटकेससारखी सहज उचलून नेता येईल अशी “घडीची’ मोटारसायकल मॉस्कोचे यंत्रज्ञ अलेक्‍झांडर सेद्युक यांनी नवे तंत्रज्ञान वापरून आणि कष्ट घेऊन बनविली आहे.

मोटारसायकलची केवळ दोन-तीन मिनिटांत घडी घालता येते आणि वरच्या मजल्यावरही ती नेता येते. या मोटारसायकलला एक अश्‍वशक्‍तीचे इंजीन असून तिला ताशी 30 किलोमीटर (सुमारे 20 मैल) वेग येऊ शकतो. ही मोटारसायकल घराची गच्ची वा मोठ्या दिवाणखान्यातही चालविता येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.