व्यक्‍तिविशेष : तलत महमूद

-शर्मिला जगताप

सुप्रसिद्ध गझलसम्राट तलत महमूद यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी लखनऊ येथे झाला. त्यांचे वडील इस्लामिक धार्मिक गीत गात असत. लहानपणी तलत यांनी आपल्या वडिलांची नक्‍कल करायला सुरुवात केली. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. संगीत शिकण्यासाठी त्यांनी मॉरिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या 16 व्या वर्षी तलत यांना कमलदास गुप्ता यांचे एक गीत “सब दिन एकसमान नही’ गाण्याची संधी मिळाली. हे गीत लोकप्रिय झाले.

कुंदनलाल सहगल यांच्याकडून प्रेरणा घेऊन तलत गायक-अभिनेते बनण्यासाठी 1944 साली कलकत्ता (आताचे कोलकाता) पोहोचले. नेमके त्याचवेळी सहगल कलकत्ता सोडून मुंबईला गेले. न्यू थियटर्सने तलत यांना 1945 साली राजलक्ष्मी या चित्रपटात नायक-गायक बनण्याची संधी दिली. यातील त्यांचे “जागो मुसाफिर जागो’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले.

पुढे ते मुंबईला जाऊन अनिल विश्‍वास यांना भेटले. मात्र अभिनेता बनण्यासाठी शरीरयष्टी खूपच कमकुवत असल्याचे कारण सांगत अनिलदा यांनी तलत यांना पुन्हा माघारी पाठविले. तलत यांनी 1949 सालापर्यंत कलकत्ता येथे आणखी दोन चित्रपटात काम केल्यानंतर पुन्हा मुंबई गाठली. यावेळी अनिलदा यांनी तलत यांना फिल्मिस्तान स्टुडिओचा चित्रपट “आरजू’मध्ये गाण्याची संधी दिली.

तलत यांची गझलवर पकड होती, तरीसुद्धा चित्रपटांत त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 1956 साली दक्षिण आफ्रिकेत त्यांना गाण्यासाठी बोलाविण्यात आले. अशा प्रकारच्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याचा पहिला मान तलत यांच्याकडे जातो. हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. त्यांनतर तलत यांनी अशाप्रकारचे कार्यक्रम विदेशात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी आपल्या गायनाचा जलवा विदेशातही पोहोचवला.

गायक ते अभिनेता असा त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रभाव पाडला. जवळपास 13 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 1958 साली त्यांनी फक्‍त गायनावर लक्ष केंद्रित केले. ऊर्दूची माहिती असल्यामुळे चित्रपटांतील गझल गायनासाठी ते प्रथम पसंतीचे गायक होते. दोनशे चित्रपटांत त्यांनी तब्बल पाचशेपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्याचबरोबर अडीचशे इतर गाणी गायली आहेत. 9 मे 1998 रोजी तलत यांचे निधन झाले मात्र त्यांचा आवाज अमर झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.