अंतराळ प्रवासाचे प्रयोगांत अद्भुत प्रयोग पुढेच आहेत
प्रा. व्ही. व्ही. नारळीकर यांचे गणित परिषदेत भाषण
पुणे, ता. 1 – अवकाश किंवा अंतराळ प्रवासाबद्दल आतापर्यंत जे प्रयोग आपल्याला ज्ञात झाले आहेत ते प्रयोग म्हणजे या क्षेत्रातील पहिली चुणूकच आहे. याहून अधिक विस्मयजनक व आश्चर्यकारक प्रयोग यापुढेच व्हावयाचे आहेत. मात्र रशिया आणि अमेरिका या दोन देशांना आता या गोष्टीची जाणीव झाली आहे की यापुढे तरुणांना अवकाश संचाराकरिता तयार करावयाचे असेल तर त्यांना गणितशास्त्राची लहाणपणापासूनच गोडी लावली पाहिजे.
या बाबतीत भारतीय अध्यापकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव करून घेण्याची वेळ निश्चितपणे आली आहे. भारतीय गणित मंडळाच्या अधिवेशनात प्रा. व्ही. व्ही. नारळीकर यांचे “स्फुटनिक’ या विषयावर उद्बोधक भाषण झाले.
महिला शिक्षणाच्या अहवालावर सह्या
नवी दिल्ली – महिला शिक्षणविषयक समितीने आज आपल्या अहवालावर सह्या केल्या. हा अहवाल पुढील आठवड्याच्या प्रारंभी सरकारला सादर करण्यात येईल. या अहवालाची 400 पृष्ठे असून 17 विभाग आहेत असे कळते. अल्पमुदतीच्या व कायम स्वरूपाच्या अशा द्विविध शिफारशी समितीने केल्या आहेत असे कळते. या समितीच्या अध्यक्ष श्रीमती दुर्गाबाई देशमुख असून सभासद सात आहेत.
पाकिस्तानात हिंदूंच्या सणाची सुट्टी नाही
कराची – पाकिस्तान सरकारतर्फे नव्या वर्षातील अधिकृत सुट्ट्यांची जी यादी जाहीर झाली आहे त्या यादीत पाकिस्तानातील अल्पसंख्य जमातीच्या सणांच्या सुट्ट्यांना स्थान नाही. हिंदू, ख्रिश्चन आणि पारसी लोकांच्या सणांच्या सुट्ट्या या यादीत समाविष्ट केलेल्या नाहीत.
तथापि, सुट्ट्यासंबंधी काढलेल्या सरकारी पत्रकात अल्पसंख्य जमातीच्या लोकांना त्यांच्या सणादिवशी सुट्टी मिळेल असे जाहीर करण्यात आले आहे.