चीनपासून तिबेटमार्गे हिंदच्या सरहद्दींना भिडणारे राजमार्ग
नवी दिल्ली, दि. 11 – चीनने 1954 ते 1965 या काळात तिबेटमार्गे दोन महत्त्वाचे राजमार्ग बांधले असून ते भारताच्या सीमांना भिडलेले आहेत. चांबो-ल्हासा राजमार्ग हा चीनमधील चें-गटू प्रांतातून सुरू होतो व तो ल्हासा-सिकियांग राजमार्गास जोडण्यात आला आहे. चांबो-ल्हासा राजमार्गाच्या 3 शाखांपैकी एक शाखा नेफोच्या सरहद्दीवरून त्सेपला गावापर्यंत जाते. 1962 साली हल्ल्याच्या वेळी चीनला या रस्त्याचा फार उपयोग झाला होता. दोवा नोर्बू यांनी लिहिलेल्या “रेड स्टार ओव्हर चायना’ या नव्या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे.
कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढवणार असल्याची घोषणा
मेक्सिको सिटी – चलनफुगवट्याला तोंड देण्यासाठी लवकरच कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढविण्यात येतील, अशी घोषणा इराणचे शहा महंमद रेझा पहलवी यांनी केली. अमेरिकन डॉलरची किंमत गेल्या वर्षी घसरली, त्यामुळे तेल उत्पादक राष्ट्रांची खरेदीशक्ती 30 ते 35 टक्क्यांनी घटली.
संपूर्ण क्रांतीचा रोख सरकारविरूद्ध?
त्रिवेंद्रम् – मला जी “संपूर्ण क्रांती’ अपेक्षित आहे व जिचे नेतृत्व युवकांनी करावयाचे आहे तिचे उद्दिष्ट सरकार विरूद्धच असले पाहिजे असे नाही, असे उद्गार जयप्रकाश नारायण यांनी येथे विद्वानांच्या मेळाव्यात काढले