क्रांतिकारी कार्य चालू राहावे ही माओंची अखेरची इच्छा
पेकिंग, दि. 16 – “चिन्यांचे क्रांतिकारक कार्य पुढे चालू राहावे’, ही अध्यक्ष माओ-त्से-तुंग यांनी व्यक्त केलेली अखेरची इच्छा होती, असे आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यापूर्वी जाहीर न करण्यात आलेले हे माओंचे विधान आज “पीपल्स डेली’ या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रात, त्याचप्रमाणे “रेड प्लॅग’ वृत्तपत्रात व “जनता स्वातंत्र सेने’च्या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले.
“ठरवून दिलेल्या तत्त्वानुसार वागा’ असा संदेश माओंनी अखेर दिल्याचेही या वृत्तपत्रांत म्हटले आहे. माओंचे हे विधान यापूर्वी प्रसिद्ध झाले नव्हते. “आम्ही हे कधीच ऐकले नव्हते’ असे आज अनेक नागरिकांनी सांगितले.
कुटुंब नियोजन प्रचारः तमाशा कलावंतांचा उपयोग करणार!
पुणे – राज्यातील तमाशा कलावंताचा यापुढे शासन कुटुंब नियोजन प्रचारासाठी उपयोग करून घेणार असून त्या संबंधीची योजना आखली जात आहे, अशी माहिती क्रीडा व समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. आरोग्यमंत्री डिसूझा यांनाही ही कल्पना पसंत पडली असून त्यासंबंधी योजनेची आखणी सध्या सुरू आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी कलाकार व शाहिरांचे एक पथक नियुक्त करण्यात येऊन योग्य मोबदल्यात त्यांना कुटुंब नियोजन प्रचाराचे काम देण्यात येईल. यामुळे कलाकारांना आर्थिक साहाय्य होईल. ही योजना हेल्थ युनिटच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे, असेही राज्यमंत्री म्हणाले.