अग्रलेख : क्रिकेट विश्‍वचषक दोन पावले दूर

आतापर्यंतच्या सर्वांत चुरशीच्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत मंगळवारी बांगलादेशला 28 धावांनी नमवत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे आता भारतापासून क्रिकेट विश्‍वचषक फक्‍त दोन पावले दूर राहिला आहे. अर्थात, आतापर्यंत ज्या ठामपणे भारतीय संघाने पावले टाकून इतर संघांना नमवले आहे त्याच ठामपणे यापुढेही कामगिरी करून भारताला ही स्पर्धा जिंकावी लागेल.

साखळी फेरीतील भारताचा आणखी एक सामना बाकी आहे. त्या सामन्याच्या निकालाचा कोणताही परिणाम भारताच्या भवितव्यावर होणार नसला तरी गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहण्यासाठी भारताला श्रीलंकेसोबतचा हा सामनाही जिंकावा लागेल. उपांत्य फेरीत कोणत्याही संघाशी गाठ पडली तरी त्याला तोंड देण्यासाठी टीम इंडिया सक्षम असली तरी गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावरील स्थान वेगळाच आत्मविश्‍वास देऊन जाते. आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यांत भारताने विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात पराभव झाला आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. उपांत्य फेरीच्या मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने या कामगिरीचा लेखाजोखा मांडून कच्चे दुवे सुधारण्याची हीच वेळ आहे.

भारताने जे विजय मिळवले त्यापैकी अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तुलनेने कमकुवत संघांनी भारताला विजयासाठी झुंजवले होते, तर इंग्लंडने भारताचा जो पराभव केला त्यात भारतीय संघाच्या काही उणिवा समोर आल्या होत्या. यावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती उपांत्य किंवा अंतिम फेरीत होणे परवडणारे नसल्यानेच टीम इंडियाने आता काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः चौथ्या क्रमांकावर कोणी खेळायला यायचे हा प्रश्‍न स्पर्धा सुरू झाल्यापासून कायम होता. राहुल आघाडीवर फलंदाजीसाठी गेल्यावर त्याला पर्याय म्हणून आलेल्या विजय शंकरने तो प्रश्‍न सोडवला नाही. गेल्या दोन सामन्यांत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने उपयुक्‍त आणि चांगली कामगिरी करून हा प्रश्‍न सोडवला, असे वाटत असले तरी ऋषभ अननुभवी आहे. काहीसा अपरिपक्‍व आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात त्याची मानसिकता योग्य राखण्याचे काम संघाला करावे लागेल. तसे झाले तरच चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न सुटला असे म्हणता येऊ शकेल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली सुरुवात झाल्यानंतरही भारताला अतिभव्य धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. कारण धावगती जेव्हा वाढवण्याची गरज असते तेव्हाच भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याची उदाहरणे या स्पर्धेने समोर आणली आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या काही षटकांमध्ये हे आव्हान अशक्‍यप्राय गोष्ट वाटू नये म्हणून सुरुवातही दमदार असायला हवी आणि शेवटच्या षटकातही तुफानी फलंदाजी करण्याची गरज आहे; पण तसे झाले नाही तर पराभव स्वीकारावा लागतो हे इंग्लंविरुद्धच्या पराभवातून सिद्ध झाले आहे. या सामन्यात भारताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या 10 ओव्हरमध्ये केवळ 28 धावा केल्या. त्याचवेळी, शेवटच्या पाच ओव्हरमध्ये धोनी आणि केदार जाधवने संथ फलंदाजी केली होती. साहजिकच भारताला पहिला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे एखादी चांगली भागीदारी झाली तर त्याच्या आधारावर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागतील.

साहजिकच या क्षेत्रात भारताला मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागणार आहे. पंत आणि हार्दिक पांड्या यांच्यामुळे भारतासमोर धावगती वाढवणारे चांगले पर्याय असले तरी हे दोघे अपयशी ठरले तर कोणी जबाबदारी घ्यायची हे ठरवावे लागणार आहे. महान फलंदाज महेंद्रसिंग धोनी योग्यवेळी फॉर्मात येऊन आपले ग्रेट फिनिशर हे बिरुद सिद्ध करेल अशी आशा त्यासाठी करावी लागेल. गोलंदाजीच्या आघाडीवर कोणतीही समस्या नसली तरी फिरकी गोलंदाजांना अधिक प्रभावी कामगिरी करावी लागेल. शमी, भुवनेश्‍वर आणि बुमराह हे त्रिकुट गोलंदाजीच्या जीवावर भारताला विजयी करण्यात सक्षम असले तरी त्यांना फिरकीपटूंची साथ मिळायला हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही संघाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर एखाद्या खेळाडूने जबाबदारी स्वीकारून संघासमोर आदर्श उदाहरण ठेवणे गरजेचे असते. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर सचिन तेंडुलकरने 2003 मध्ये अफलातून प्रदर्शनासह “मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता.

टीम इंडियाने तेव्हा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण स्पर्धा जिंकता आली नव्हती. 2011 मध्ये युवराजसिंगने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत “मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला होता आणि विश्‍वचषकावर भारताचे नाव कोरले होते. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 22 विकेट्‌ससह संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यावर्षी भारताचा विचार करता रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात आहे. रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी साकारून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्णधार विराट कोहली त्याच्या नेहमीच्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. शिखर धवनच्या जागी सलामीवीर म्हणून आलेल्या राहुलकडूनही उपयुक्‍त कामगिरी होत आहे; पण भारतीय फलंदाजी या आघाडीवीरांवरच अवलंबून असल्याचा संदेशही यातून मिळत आहे.

रोहित आणि विराट यांच्यावरच भारतीय फलंदाजी अवलंबून असेल तर स्पर्धक संघ त्याप्रमाणे रणनीती आखू शकतो. म्हणूनच आता इतर फलंदाजांनीही जागे होऊन आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. कारण उपांत्य पातळीवरील आव्हान अधिक अवघड असणार आहे. सध्याचे चित्र पाहता उपांत्य किंवा अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यापैकी एकाशी सामना करावा लागणार आहे. हे तिन्ही संघ बलवान आहेत. त्यामुळे त्यांना नमविण्यासाठी भारताने त्याप्रमाणेच आपली रणनीती आखण्याची गरज आहे.

सध्यातरी मधल्या फळीचे अपयश ही एकच भारतासाठी चिंतेची बाब आहे. पण महत्त्वाच्या सामन्यात खेळ उंचावण्याची क्षमता भारतीय फलंदाजांमध्ये असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तसा खेळ उंचावला तरच विश्‍वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरता येणार आहे. विराट आणि रोहितच्या प्रयत्नांना इतरांची साथ मिळाली तर अशक्‍य काहीच नाही. त्यामुळे “टीम इंडिया आगे बढो’ अशाच शुभेच्छा सध्या द्याव्या लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.