वैज्ञानिक प्रगतीसाठी गणित शास्त्रात झपाट्याने प्रगती केली पाहिजे – चव्हाण
पुणे, ता. 31 – “विज्ञानाच्या प्रगतीचा गाभा आणि पाया गणित शास्त्र आहे. गणित शास्त्र आणि गणितज्ज्ञ यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची ओळख आपण करून घेतली पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशामध्ये विज्ञानविषयक कार्याची वाढ झालेली असली तरी इतर देशांमधील या शास्त्रातील प्रगती लक्षात घेता आपणाला या पुढे या शास्त्रात फारच झपाट्याने प्रगती करावयास हवी’ असे आवाहन आज मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले आहे. भारतीय गणित मंडळाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी येथे विद्यापीठाच्या आवारात भरलेल्या 24व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले.
आठ शिवलिंगे सापडली
गौहत्ती – येथील एका टेकडीवरील जंगलाची तोड करीत असता कामगारांना जमीन उकरणीत 8 शिवलिंगे आढळून आली. अर्धा मण वजनाचे विटाचे ढिगारेही या ठिकाणी सापडले. त्याचप्रमाणे विहिरीचे अवशेषही मिळाले. इतिहास पूर्वकाळातील मंदिराचे हे अवशेष असावेत. हा भाग कण्वाचल म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणीच शकुंतला व दुष्यंत यांची भेट झाली.
क्युबामधील यादवी युद्धात 1000 लोक बळी पडले!
हॅवाना – क्युबामधील ला व्हेगास प्रांताच्या सॅंटा क्लेरा या राजधानीचा ताबा घेण्यासाठी घराघरांतून चकमकी होऊन सुमारे 1000 लोक बळी पडले, असे समजते. ठार झालेल्यात सैनिक-नागरिक व बंडखोरांचा समावेश आहे. फायडेल कॅस्ट्रोच्या बंडखोर सैनिकांवर सरकारी विमाने बॉंब टाकून मशीनगनचाही मारा करीत आहेत.न्यूयॉर्क रेडिओ वृत्तात म्हटले आहे की, बंडखोरांनी एक शस्त्रागार उडवून दिले. त्यात 7 सैनिक ठार झाले. बंडखोर ओरेंटी प्रांताची राजधानी सॅंटियागो काबिज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेथे 10 हजार सैनिक संरक्षणार्थ ठेवले आहेत. सध्या सॅंटा क्लेराशी दळणवळण तुटले आहे. या शहराची लोकसंख्या 1,50,000 आहे.
खोडकर पोरांचा पराक्रम!
इव्हान्स व्हॅली, (इंडियाना) – एका रेल्वे गार्डाच्या दोन पोरट्यांच्या पराक्रमाने रेलगाड्यांची टक्कर होऊन दोन रेल्वे कामगार जखमी झाले व रूळावर वाघणी उपड्या पडल्याने अनेक तास वाहतुकीचा खोळंबा झाला. दिव्याचे रंग कसे बदलतात हे पाहण्यासाठी या दोन उपद्व्यापी पोरांनी रेल्वे स्विच उखडून फेकून दिला होता. त्या पोरांच्या आईनेच आपल्या पोरांनी अशी कबुली दिल्याचे सांगितले.