-माधव विद्वांस
जगामध्ये मोठ्या प्रमाणावर चॉकलेटचा प्रसार करणारे हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्शे यांचा आज स्मृतिदिन. त्यांना “चॉकलेट किंग’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1857 रोजी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामधील डेअरी टाउनशिपमध्ये झाला. त्यांचा जन्मदिवस “चॉकलेट डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात झाला होता.
त्यांचे शिक्षणही फार झाले नव्हते. त्यांना कुटुंबाला मदत करण्यासाठी वयाच्या 14 व्या वर्षीच 1871 मध्ये शाळा सोडून द्यावी लागली. ते एका जर्मन वृत्तपत्राच्या प्रेसमध्ये कामाला लागले. त्यांच्या आईला व आत्याला मिल्टनने मिठाईचा व्यवसाय करावा, अशी इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या आईने पेनसिल्व्हेनियाच्या लॅंकेस्टर येथे जोसेफ रॉयर नावाच्या मिठाईवाल्याकडे त्यांना शिकण्यासाठी पाठविले. तेथे चार वर्षे राहून ते मिठाई (स्वीट कॅंडी) शिकले.
मिठाईमध्ये आकर्षक प्रकार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. याच सुमारास कोकोचा वापर सुरू झाला होता. याचा अधिक प्रभावीपणे वापर करता येईल का, याचा त्यांनी विचार सुरू केला. कोको कडू असले तरी त्याचा रंग व चव याचा स्वादावर व वडी दिसण्यास चांगला उपयोग त्यांनी करून घेतला. कोकोचे उत्पादन शेजारील मेस्किकोमध्ये होत असल्याने तसेच दूधही अमेरिकेत उपलब्ध असल्याने त्यांना उत्पादनाच्या दृष्टीने सोपे झाले.
मिल्टन यांनी अत्यंत कडवट फळाचा दुधात वापर करून चॉकलेट निर्मितीचा पाया घातला. हे दुधात घालून पेयही तयार होते. तसेच याचा केकमध्ये तसेच अनेक बेकिंग पदार्थांत वापर केला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी दोन वेळा उद्योग करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हर्शेने त्यांच्या मावशीकडून 150 डॉलर्स उसने घेतले आणि फिलाडेल्फियाच्या मध्यभागी स्वतःचे कॅंडी शॉप स्थापित केले. थोडा अनुभव घेतल्यावर वर्ष 1883 मध्ये हर्शे लॅंकेस्टरला परत आले. लॅंकेस्टर कारमेल कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले व ते लवकरच यशस्वी झाले.
आधीच्या अनुभवातून मिळवलेली कारमेल रेसिपी त्यांनी कॅंडीसाठी वापरली. 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड कोलंबियन प्रदर्शनात हर्शे यांनी चॉकलेट बनवण्याच्या कलेकडे बारकाईने पाहिले. दरम्यान, इंग्लंडमधील एका व्यापाऱ्याने लॅंकेस्टरला भेट दिली. त्यांना हर्शेच्या कॅंडी इतक्या आवडल्या की, त्यांनी ब्रिटनला पाठवावयाची एक मोठी ऑर्डर दिली. त्यांनी वर्ष 1898 मध्ये कॅथरीन एलिझाबेथ ऊर्फ किट्टी बरोबर विवाह केला. त्यांच्या पत्नीचे वर्ष 1915 मध्ये निधन झाले. त्यांनी दुसरे लग्न केले नाही तसेच त्यांना मूलबाळ नव्हते.
वर्ष 1900 मध्ये त्यांनी लॅंकेस्टर कारमेल कंपनी 10 लाख डॉलर्सला विकून जगातील सर्वांत मोठ्या चॉकलेट कंपनीची स्थापना केली. एक चॉकलेट उत्पादन करणारे औद्योगिक शहर स्थापन केले.पहिल्या महायुद्धात लष्कराला त्यांनी चॉकलेटचा पुरवठा केला. त्यांनी अमाप संपत्ती मिळवली, पण हर्शे चॉकलेट कंपनी ट्रस्टची निर्मिती करून सर्व मालमत्ता ट्रस्टकडे सोपविली. मिल्टन हर्शे यांचे 13 ऑक्टोबर 1945 रोजी निधन झाले.