संरक्षण : चीनने काय गमावले?

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

चिनी अतिक्रमणाला 7 महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारत-चीन संबंधांमध्ये प्रत्येक आघाडीवर चीन पिछाडीवर आहे.

दौलतबेग गोल्डी रोड भारत बांधत असल्याने चीनने लडाखमध्ये अतिक्रमण केले, असे सांगितले गेले. परंतु हा रस्ता बांधण्याचे काम अजूनही सुरू आहे. चीनची अपेक्षा होती की, गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भाग नाही, त्यावर भारत पुन्हा दावा करणार नाही, मात्र असे झाले नाही. देप्सांगमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैन्याची गस्त थांबवली असली तरीही पेगॉग सो लेकच्या दक्षिणेकडे चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर गेले आहे. लष्करीदृष्ट्या चीनला काहीही साध्य करता आलेले नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून चीन मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार युद्ध भारताबरोबर करत आहे. परंतु त्याचा भारतीय सरकारवर, लष्करावर काहीही परिणाम झाला नाही. भारतीय जनताही चीनच्या विरोधातच आहे. भारत अत्यंत पद्धतशीरपणे चीनविरुद्ध वेगवेगळ्या स्तरावर आक्रमक कारवाई करत आहे.
पाकिस्तान सोडून बहुतेक सर्वच देश चीनच्या विरोधात उभे आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची पीछेहाट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत 290 चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने चिनी सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ऍप्सवर बंदी घालायला सुरुवात केली. तेच उदाहरण बघून अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक देशांनीही त्याची री ओढली आहे. त्यामुळे भारताच्या नेतृत्वाखाली चिनी तंत्रज्ञानाविरुद्ध उघडलेल्या आघाडीमध्ये चीनची पीछेहाट झाली आहे. चीनची 5 जी तंत्रज्ञान पुरवणारी सर्वात मोठी कंपनी हुवाईला अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी माघारी धाडले आहे. भारताने चीनचा प्रथम क्रमांकाचा शत्रू जपान, तैवान यांच्याशी आपले संबंध मजबूत केले आहेत. ऑस्ट्रेलियाही पुढील काही वर्षांत स्वतःची संरक्षण सिद्धता 40 टक्‍क्‍यांहून जास्त प्रमाणात वाढवणार आहे. जपाननेसुद्धा आपल्या लष्करी खर्चामध्ये मोठी वाढ करण्याचे ठरवले आहे. हे चीनच्या विरोधातच आहे.

चिनी आक्रमक कारवायांमुळे भारत-अमेरिका यांचे संबंध उच्च पातळींवर पोहोचले आहे. अनेक प्रकारचे तंत्रज्ञान, गुप्तहेर माहितीची देवाणघेवाण, सामरिक मदत आतापर्यंत अमेरिका देत नव्हती, ती सर्व मदत आता भारताला दिली जाते आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चार मोठी राष्ट्रे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील केवळ संरक्षण संबंध सुधारले नाहीत, तर सामरिक संबंध, तंत्रज्ञानाचे संबंध आणि गुप्तहेर माहिती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.
अमेरिकेने पाठवलेल्या युद्धनौकांमुळे दक्षिणपूर्वेकडील देशांनी चिनी आक्रमकतेविरुद्ध बोलायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर इतर लहान देश म्हणजे मालदीव, नेपाळ या देशांमध्येसुद्धा अमेरिकेने प्रवेश केल्याने भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये झालेली चिनी घुसखोरी कमी होण्यास मदत होईल.

चीनचे सैन्य दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे असा चीनने दावा केला होता. मग त्यांना लढाई का करता आली नाही, गलवानमध्ये त्यांची पिटाई झाल्यानंतर चीन लष्करीदृष्ट्या शांत बसलेला आहे. कारण चिनी सैन्याची भारतीय लष्कराशी भिडण्याची हिंमत नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरोधात चीनमध्ये राग आहे. ज्या चिनी नागरिकांची मुले सैन्यात आहेत त्यांना वाटते की, विनाकारण त्यांच्या मुलांना चिनी नेतृत्वाच्या आक्रमकतेचा त्रास होत आहे. कोणताही चिनी नागरिक आपल्या मुलाचा लढाईमध्ये बळी देण्यासाठी तयार नाही. चिनी सैन्याचे वरचे नेतृत्व हे लष्करी कमी आणि राजकीय नेतृत्व अधिक आहे.

जे चीन सैनिक निवृत्त झाले त्यांच्यातही कम्युनिस्ट पक्षांविषयी राग आहे कारण त्यांना पुरेसे निवृत्तीवेतन मिळत नाही. चीनचे प्रपोगंडा वॉर हे त्यांच्या स्वतःच्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यामधे कमी पडत आहे. चिनी सैन्याचा 20 टक्‍के प्रशिक्षणाचा वेळ हे कम्युनिस्ट पक्षाचे तत्त्वज्ञान शिकण्यातच जातो. एकाच वेळी चीनने दक्षिण चीन समुद्रात भारत, तैवान, जपान यांच्याविरोधात आक्रमक कारवाई करायला सुरुवात केल्याने चीनची सर्वच आघाडीवर माघार झाली आहे. सर्वच राष्ट्रे जी चीनच्या आक्रमक आर्थिक घुसखोरीमध्ये अडकली ती स्वतःला चीनपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे. थोडक्‍यात, चीनने भारताविरोधात लडाखमध्ये जी आक्रमक कारवाई सुरू केली होती त्यात त्यांना सर्वच स्तरांमध्ये अपयश येत आहे. त्यामुळे सर्वच थरांमध्ये चिनी सरकारविरोधात राग आहे. म्हणजे हा राउंड भारताने जिंकला आहे.

अर्थात, येत्या काळात चीनची आक्रमकता कमी होईल आणि चिनी सैन्य लडाखमधून परत जाईल का, या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण चीन लडाखमधून मागे हटणार नाही. त्यामुळे भारताला लडाख सीमेवर असलेल्या आपल्या सैन्याची ताकद वाढवावी लागेल. सैन्याचे आधुनिकीकरण सुरू ठेवावे लागेल. कारण चिनी सैन्य पुन्हा आक्रमक होऊ शकते. त्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. येत्या काळात आपली युद्धक्षमता वाढवणे गरजेचे आहे. आपल्या मित्र राष्ट्रांची एक फळी निर्माण करायला पाहिजे. चीनच्या हायब्रीड वॉरला उत्तर देण्यासाठी भारताच्या विविध राष्ट्रीय ताकदीचा वापर करून चीनला आक्रमकरित्या उत्तर द्यायला पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.