टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपची धूम सुरू असताना खरा सिक्सर मारला तो केजरीवालांनी..! दिवाळीचे फटाके फुटत असताना सगळ्यात मोठ्ठा ऍटमबॉम्ब त्यांनीच फोडला. वाह, केजरीवाल वाह! बहुत खूब! मुळातच चर्चेच्या परिघाबाहेर गेलेले विषय आपण आणखी दूर ढकलून दिलेत आणि अतिशय कळीचा विषय चर्चेत आणलात… नोटेवर कुणाचा फोटो असावा? नोटा कुणाकडे किती असाव्यात आणि वास्तवात कुणाकडे किती आहेत, अशा किचकट प्रश्नाला हात न घालता त्यांनी दिवाळीच्या दिवशी खऱ्या अर्थानं लक्ष्मीपूजन केलं.
कदाचित चांदीच्या ताटात सोन्या-चांदीचे दागिने आणि नोटा-नाणी ठेवून त्यांची पूजा करत असताना त्याच ताटात ठेवलेला लक्ष्मीचा फोटो त्यांना नोटेच्या रंगात मिसळून गेल्याचा भास झाला असावा आणि ते ओरडले- युरेका..! मग त्यांनी थेट पंतप्रधानांकडे मागणीच करून टाकली, लक्ष्मीचा फोटो नोटांवर छापा..! या अनपेक्षित विधानानं बसलेला धक्का ओसरल्यानंतरही काय प्रतिक्रिया द्यायची, हे अनेकांना समजलं नाही आणि तिथेच केजरीवालांची “स्कीम’ यशस्वी होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं. यथावकाश पहिली प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून आली. नोटांवर लक्ष्मीचा नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापावा, अशी मागणी पक्षानं केली. यामुळे भाजपची मात्र भलतीच कोंडी झाली. नोटांवर फोटो छापण्यासाठी कुणाचं नाव पुढे आणावं, हे भाजप नेत्यांना समजेनाच! सबब हा विषयच भाजपकडून दुर्लक्षित केला जाईल, असं वाटत असतानाच…
“नोटेवर फोटो छापायचाच असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छापा,’ अशा आशयाचं विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून केलं. ही आपली “वैयक्तिक इच्छा’ असल्याचं ते म्हणालेत खरं; पण भाजपचे आमदार म्हणूनच या इच्छेकडे बघितलं जाणार. सुदैवानं फोटो मॉर्फ वगैरे करण्याचं तंत्रज्ञान इतकं अत्याधुनिक झालंय, की त्या-त्या फोटोसह नोटा कशा दिसतील, याचं “प्रारूप’ सोशल मीडिया साइट्सवर झळकू लागलं आणि नेटकऱ्यांना कामधंदा मिळाला. खरं तर या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. कारण दहा-वीस रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असंख्य रंगीबेरंगी नोटा चलनात आल्या आहेत.
जसे वेगवेगळे रंग त्यांनी धारण केलेत, तसेच वेगवेगळे फोटोही नोटा धारण करू शकतील; पण एवढं करूनसुद्धा या महापुरुषांना मनापासून मानणाऱ्या लोकांपर्यंत त्या पोहोचणार का? असो… केजरीवालांच्या मागणीला “स्कीम’ म्हणावंसं का वाटलं? या प्रश्नाचं उत्तर ज्यांना हवंयत्यांनी “थ्री इडियट्स’मधला चतुर आठवावा. परीक्षेत पहिला नंबर मिळवण्यासाठी इतर परीक्षार्थींचं लक्ष विचलित करून स्वतः घोकंपट्टी करणारा हा चतुर आम्हाला केजरीवालांमध्ये पुरेपूर दिसला. स्वतः “पानी, बिजली, स्कूल, अस्पताल, रोजगार’ वगैरेवर बोलायचं आणि इतरांना फोटोमध्ये अडकवायचं, यालाच म्हणतात “स्कीम’!
अर्थात, आता विषय निघालाच आहे, तर याविषयी आमचंही मत सरकारने ऐकून घ्यायला हवं. केजरीवालांचा पक्ष “आम आदमी’च्या नावानं स्थापन झालाय, त्यामुळे त्यांनाही आमची सूचना निश्चित आवडेल. आमच्या मते, सर्व प्रकारच्या नोटांवर आर. के. लक्ष्मण यांच्या “कॉमन मॅन’चा फोटो छापावा. कारण कुणाचाही फोटो छापला तरी अखेर सर्व नोटा मोजक्या तिजोऱ्यांमध्येच जमा होणार आहेत. किमान त्या कुणाच्या खिशातून आल्या याची जाणीव संबंधितांना व्हायलाच हवी!