पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद रॅंग्लर परांजपे यांना मिळणार
पुणें, ता. 2 – पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद डॉ. बाबासाहेब जयकर यांचेनंतर डॉ. र. पु. परांजपे यांचेकडे जाईल असे विश्वसनीयरीत्या कळते. डॉ. बाबासाहेब जयकर यांची कुलगुरूपदाची मुदत फेब्रुवारी 1956 अखेर संपते. त्यानंतर त्यांचे जागी कोणाची निवड करावी यासंबंधी पुणे विद्यापीठ कोर्टाच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांमध्ये गेले कित्येक दिवस अनौपचारिक विचार चालू आहे.
याबाबतीत अर्थमंत्री श्री. चिंतामणराव देशमुख यांचेही नाव सुचविण्यात आले होते. परंतु केंद्रीय मंत्रिपदाच्या जबाबदारीतून ते मार्च 1957 पूर्वी साधारणतः मुक्त होऊ शकत नाहीत हे उघड दिसत असल्यामुळे, त्यांचे नाव अर्थातच मागे पडले.
कुलगुरूपदासाठी कार्यकारी मंडळाने तीन नावे सुचवावयाची असतात व त्यातून अखेरची निवड विद्यापीठ कोर्टाकडून व्हावयाची असते. कार्यकारी मंडळांतील बहुतेक प्रमुख सभासदांचा डॉ. परांजपे यांच्या निवडीसच पाठिंबा असल्यामुळे व डॉ. परांजपे यांनी हे अधिकारपद ग्रहण करण्यास अनुमती दिलेली असल्याकारणाने अखेर त्यांचीच निवड होईल असा माहितगार गोटांचा कयास आहे.
सर्व शाळांतून नॅशनल कॅडेट कोअरचे शिक्षण सुरू होणार
मुंबई – मुंबई राज्यातील सर्व शाळांमधून नॅशनल कॅडेट कोअरचे शिक्षण देण्याची योजना सुरू करण्याच्या प्रश्नावर सरकार विचार करीत आहे.
पुढील पाच वर्षांत तीन लाखांहून अधिक शाळकरी मुलांना शारीरिक शिक्षण आणि विकास योजनेच्या कामाचे शिक्षण देण्यात येईल, असे श्रीमती इंदूमती सेठ यांनी येथे बोलताना जाहीर केले.
ग्रामपंचायतींच्या अधिकारात वाढ होणार
मुंबई – मुंबई राज्यातील ग्राम पंचायतींना जादा अधिकार देण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती सुचविणारे विधेयक तयार करण्यात आले आहे या विधेयकास सरकारी आज्ञापत्रिकेत प्रसिद्धी देण्यात आली आहे