माओ विचारांवर भाष्य करण्याचा अधिकार हुआंना
टोकियो, दि. 14 – चीनने पंतप्रधान हुआ कुआ फेंग हे माओवादाचे एकमेव भाष्यकार ठरले आहेत. हुआ हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे नियोजित अध्यक्ष असून कोणत्याही चिनी नेत्यांपेक्षा त्यांच्या हाती आज अधिक सत्ता एकवटलेली आहे.
त्यातच माओ यांचे विचार एकत्रित करून प्रसिद्ध करण्याची जबाबदारी सोपविलेल्या पक्षीय समितीचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे माओवादावर “अचूक भाष्य’ करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असून माओंनंतरचा माओवाद काय हे सदर समिती जे ठरवील तेच ठरेल. माओंच्या निधनानंतर माओवादावर भाष्य करण्यासाठी हुआंच्या नेतृत्वाखाली समिती नेमली.
महाराष्ट्र आमदारांना निवृत्ती वेतन देणार?
मुंबई – विधिमंडळाच्या सदस्यांनी निवृत्ती वेतन देण्याच्या योजनेवर महाराष्ट्र शासन विचार करील, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासंबंधी निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या पक्षाशी चर्चा करीन, असेही त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना सांगितले. एका प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले की, 1 जानेवारी 77 रोजी “सचिवालय’ ऐवजी “मंत्रालय’ हा शब्द अंमलात येईल.
वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्व नियंत्रणे नाहीत
ओटावा – भारतामध्ये वृत्तपत्रांवर आता प्रसिद्धपूर्व नियंत्रणे नाहीत. राष्ट्रहितास बाधक ठरणार नाही, असे कोणतेही वृत्त छापण्यास वृत्तपत्रांना मोकळीक आहे.