परिपक्व लोकशाहीसाठी अपक्ष व्यासपीठ जरूर
सेलू, दि. 12 – अपक्ष व्यासपीठ उभे केल्याशिवाय कोणत्याही देशाची लोकशाही परिपक्व होण्यास असमर्थ असते, अशा आशयाचे उद्गार ख्यातनाम विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर यांनी काढले. आपल्या देशात लोकशाही परिपक्व करण्याचा प्रयोग चाललेला असतो आणि या प्रयोगातील आतापर्यंतच्या उणिवा हा त्याचा परिणाम आहे. याचे कारण देताना ते म्हणाले, “जबाबदारीची जाणीव’ नावाची जी कल्पना आहे तेवढी सोडून देऊन आपण लोकशाही परिपक्व करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
द. आफ्रिकेतील भारतीयांनी लढ्यात ऐक्याने उभे राहावे
पोर्टलुईस – समानता व दर्जा यासाठी काळ्यांच्या चालू असलेल्या लढ्यात दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशांच्या लोकांनी आपल्या काळ्या बंधूंबरोबर ऐक्याने उभे राहावे, असे आवाहन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे केले.
आता वायूपासून पशुखाद्य
लंडन – उत्तर समुद्रातून मिळणाऱ्या वायूच्या एका पोट-उत्पादनापासून जनावरांच्या खाद्यासाठी उपयुक्त असे प्रथिन तयार करणारा जगातील सर्वात मोठा कारखाना ब्रिटनमध्ये बांधण्यात येणार आहे. हे प्रथिन वासरांना दुधाच्या बदली देता येईल.