अग्रलेख : आणखी किती दुर्घटना पाहायच्या?

गतवर्षी करोना विषाणू संक्रमणाची पहिली लाट आली तेव्हा इटली आणि युरोपमधील स्थिती किती भयाण झाली आहे, याचे व्हिडिओ, मेसेज समाजमाध्यमांतून फिरत होते. अनेकांचा तडफडून जीव जात असल्याचे या संदेशांमधून सांगितले जायचे. त्यासंदर्भात एका पत्राचे वाचनही मराठी सृष्टीतील काही कलाकारांनी केले होते. त्यामध्ये “सावध व्हा, आज जी आमची स्थिती आहे, ती उद्या तुमच्यावर येऊ शकते’ असा आपुलकीचा इशारा देण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात असे अनेक संदेश फिरत असल्याने त्यातील गांभीर्य हरपून गेल्यासारखे झाले होते. पुढे जाऊन करोनाची रुग्णसंख्याच घटत गेली आणि आपण 15 ऑगस्ट 1947 च्या सुवर्णपहाटेसारख्या आनंदात बागडू लागलो.

त्यातूनच करोनाची दुसरी लाट आली आणि पाहता पाहता ती भयावह बनत गेली. आज राज्यात आणि देशात कमलीच्या वेगाने संक्रमण वाढते आहे. पण त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे ऑक्‍सिजनच्या अभावामुळे रुग्णांचे प्राण जाताहेत. ऑक्‍सिजनला प्राणवायू का म्हटले जाते, हे आज आपल्याला भेदकतेने समजत आहे. ऑक्‍सिजनच्या पुरवठ्याबाबत सर्व स्तरावर सावळागोंधळ सुरू असतानाच नाशिकमध्ये ऑक्‍सिजनच्या सिलिंडरची गळती झाल्याने 22 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आणि अवघा देश हेलावला. दुर्घटना घडलेल्या झाकिर हुसेन या रुग्णालयात 131 जण ऑक्‍सिजनवर होते.

दुपारी बाराच्या सुमारास ऑक्‍सिजन भरला जात असताना टाकीला जोडलेल्या पाइपलाइनमध्ये दाब वाढला आणि पाइपलाइन जोडणारे नोझल तुटले फुटलेल्या भागातून ऑक्‍सिजन बाहेर पडू लागला. क्षणार्धात ऑक्‍सिजनचे पांढरे लोट रुग्णालय परिसरात दिसू लागले. रुग्णालय प्रशासनाला ही गळती थांबवण्यात यश आले. त्यानंतर वेल्डिंग करून ते नोजल बसवण्यात आले. पण तोपर्यंतच्या दीड-दोन तासांच्या काळात रुग्णांना दिला जाणारा ऑक्‍सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने 22 हून अधिक जणांचा गुदमरून मृत्यू झाला. सामान्यतः एखाद्या व्यक्‍तीला किंवा रुग्णाला 180 सेकंदांपर्यंत ऑक्‍सिजन मिळाला नाही तर तो बेशुद्ध होतो. तीन मिनिटांपर्यंत जर अशीच स्थिती राहिली तर त्याच्या मेंदूतील पेशी नष्ट होऊ लागतात आणि अंतिमतः त्याचा मृत्यू होतो.

याचाच अर्थ आपले संपूर्ण जीवन हे धनदौलत, संपत्ती, नोकरी, आलिशान गाड्या, व्यापार यांवर निर्भर नसून ते ऑक्‍सिजनवर अवलंबून आहे. असे असताना कोविडसारख्या विषाणू संक्रमणाची लागण झालेल्या रुग्णांना करण्यात येत असलेल्या ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत किती दक्ष राहायला हवे हे वेगळे सांगायला नको. याबाबतचे गांभीर्य नसल्यामुळेच नाशिकमधील दुर्घटना घडली. खरे याला दुर्घटना म्हणावे का, हाच खरा प्रश्‍न आहे. कारण वरकरणी हा अपघात वाटत असला तरी मुळात मानवी चुकीमुळे झालेली घटना आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अशा चुकांची मालिकाच करोना काळात भीषण स्वरूपात आपल्यापुढे आलेली आहे. कोविड रुग्णालयात आगी लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

भंडाऱ्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देऊनही या घटनांची पुनरावृत्ती थांबली नाही. कधी आगीमुळे, तर कधी कधी ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे, अशा दुर्घटना घडत राहतात आणि प्रत्येक वेळी आपण यातून धडा घेऊन पुढील काळात अशी चूक घडणार नाही या आशेने गप्प राहतो. ऑक्‍सिजनबाबत विचार करता गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा राज्याच्याच नव्हे तर केंद्राच्या पातळीवर केंद्रस्थानी आला आहे. कोविड रुग्णांना आवश्‍यक असणारा ऑक्‍सिजन पुरवठा कसा करता येईल यासाठी राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. पण नाशिकच्या घटनेने त्यापुढील आव्हाने उजागर केली आहेत. त्यामुळे रुग्णालयांना, कोविड केंद्रांना केवळ मुबलक ऑक्‍सिजन पुरवठा करून आपली जबाबदारी संपली अशा आविर्भावात सरकारला आणि यंत्रणांना राहता येणार नाही.

याबाबतच्या तांत्रिक बाबींविषयी खोलात जाऊन माहिती घेऊन त्यानुसार संबंधितांना मार्गदर्शन करावे लागणार आहे. प्रसंगी त्यांना प्रशिक्षित करावे लागणार आहे. तरच आपण नाशिकसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळू शकू. तांत्रिक गोष्टींबाबत अनेक घटना या अचानकपणाने घडतात. कितीही काळजी घेतली तरी त्या टाळण्यात शंभर टक्‍के यश येते असे नाही, हे मान्यच; परंतु जेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती घडते तेव्हा मात्र त्या क्षम्य नसतात. कारण एकदा घडलेली चूक पुन्हा करणे याला केवळ आपला हलगर्जीपणा, निष्काळजीपणाच जबाबदार असतो. दुसरे असे की, रुग्णालय असो, वीजनिर्मिती असो किंवा अन्य संवेदनशील यंत्रणांमध्ये बॅक अप सिस्टीम किंवा क्रायसिस मॅनेजमेंट या विषयाकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही? मध्यंतरी, शेअर बाजाराचा सर्व्हर बंद पडल्यामुळे हजारो कोटींच्या व्यवहारांचा खोळंबा झाला होता. तेव्हाही हा प्रश्‍न उपस्थित झाला होता.

मुंबईमध्ये विजेअभावी अंधार निर्माण झाला तेव्हाही याची चर्चा झाली होती. त्याबाबतही पुढे काय झाले हे समोर आलेले नाही; पण दवाखान्यांमध्ये विशेषतः जिथे जीवनरक्षक प्रणाली वापरली जाते, रुग्णांना ऑक्‍सिजनवर ठेवले जाते अशा ठिकाणी ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी आपत्कालीन स्थिती विचारात घेऊन पर्यायी व्यवस्था असलीच पाहिजे. नाशिकच्या प्रकरणामध्येही ऑक्‍सिजनचा सिलिंडर लीक झाला ही तांत्रिक बाब असू शकते; परंतु तो दुरुस्त करेपर्यंत दीड-दोन तासांच्या काळात पर्यायी व्यवस्था किंवा बॅकअप सिस्टीमचा वापर करून रुग्णांचा ऑक्‍सिजन पुरवठा जर सुरळित राहिला असता तर 22 जणांचे मृत्यू टाळता आले असते. आज आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आहे, तेथील कर्मचारी-अधिकारी, डॉक्‍टर, परिचारिका आणि सुश्रुषा करणारे सर्वच जण अत्यंत मोलाचे काम करत आहेत.

पण अशा दुर्घटनांची जबाबदारीही त्यांनी घ्यायला नको का? पण आपल्याकडे कोणतीही दुर्घटना घडली की प्रत्येक जण केवळ आणि केवळ एकमेकांकडे बोटे दाखवण्यात धन्यता मानतो. अशा मानसिकतेमुळे सुधारणा घडून येत नाहीत. त्यामुळे नाशिकच्या दुर्घटनेची चौकशी करतानाच अशा घटना भविष्यात कधीही घडणार नाहीत यासाठीचा आकृतीबंध तयार करायला हवा. समाजातील तज्ज्ञमंडळी सरकारला निःशुल्क मदतीला तयार आहेत. असे असूनही जर वारंवार दुर्घटना घडत असतील तर त्याचे खापर सरकारच्या माथ्यावर फुटणारच!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.