विदेशरंग : कॅस्ट्रो युगाचा अस्त

– आरिफ शेख

गत शुक्रवारी क्‍युबाच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या 18 व्या अधिवेशनात पक्षाचे सर्वेसर्वा राऊल कॅस्ट्रो यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्चपद सोडण्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने क्‍युबावर सहा दशके एकछत्री अंमल असणाऱ्या कॅस्ट्रो कुटुंबाच्या सत्तेचा सूर्य मावळला आहे.

अमेरिकेच्या पायथ्याला असणारा एक चिमुकला देश म्हणजे क्‍युबा. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्ता अस्तित्वात असताना याच क्‍युबाच्या प्रश्‍नावरून जग अणुयुद्धाच्या म्हणजे विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. क्‍युबात नऊ ठिकाणी अणू क्षेपणास्त्रे तैनात करण्यावरून 1962 च्या ऑक्‍टोबरमध्ये हा भयावह प्रसंग उद्‌भवला होता. रशियाने क्षेपणास्त्रे तैनाती मागे घेतली अन्‌ त्या बदल्यात अमेरिका क्‍युबावर कधीही आक्रमण करणार नाही हे आश्‍वासन दिले, अन्‌ हे महाखतरनाक संकट निवळले. या सर्व वादांचे केंद्रबिंदू होते फिडेल कॅस्ट्रो. समर्थकांच्या दृष्टीने क्रांतीचे प्रतिनाव, युगपुरुष, महासत्तेला भिडणारा असामान्य योद्धा, देशावर अर्धशतक राज्य करणारा जगातील केवळ तिसरा शासक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेच्या नाकावर टिच्चून त्यास डिवचणारा व अमेरिकी गुप्तचर संस्थेने एक दोन नव्हे तर तब्बल 638 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न करून देखील बचावलेला “लिव्हिंग लिजंड’. समर्थकांचे जेवढे प्रेम या नेत्याला मिळाले तेवढाच तिरस्कार शत्रू अन्‌ विरोधकांकडून लाभला.

हुकूमशहा बतीस्ता याचे आसन उलथवून ते 1959 ला क्‍युबाचे पंतप्रधान बनले. 1976 पर्यंत ते या पदावर होते. 1976 ला घटनादुरुस्ती नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले अन्‌ 2008 पर्यंत या पदावर राहिले. आजारपणामुळे त्यांनी पक्षाची व देशाची सूत्रे धाकटे बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे सोपविली. 2018 ला राऊल यांनी पदत्याग करीत मिगुल डियाज केनेल यांना राष्ट्रपती केले. पक्षाची दोरी मात्र राऊल यांनी आपल्या हाती ठेवली होती. आता हे सुकाणू सोडण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने क्‍युबात 60 वर्षांत पहिल्यांदाच कॅस्ट्रो सत्तेतून बाहेर झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे वर्णन “कॅस्ट्रो युगाचा अस्त’ या शब्दांत जगातील सर्व प्रमुख माध्यमांनी केले आहे.

राऊल कॅस्ट्रो पक्षाचे सर्वोच्चपद सोडणार, हे वाचून अनेकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. आपला उत्तराधिकारी त्यांनी घोषित केलेला नाही. पक्षाच्या पॉलीट ब्युरोतून नवीन नेतृत्व निवडले जाऊ शकते. विद्यमान राष्ट्रपती मिगुल डियाज यांच्याकडेच पक्षाचे “फर्स्ट सेक्रेटरी’ पद जाण्याची शक्‍यता आहे. गत शुक्रवारी पक्षाच्या 18 व्या अधिवेशनाच्या उद्‌घाटन भाषणात राऊल यांनी वरील घोषणा केली. हे करताना त्यांनी म्हटले की, आपण कोठेही जाणार नाही, निवृत्त होत नाही, शेवटच्या श्‍वासापर्यंत मी क्रांतीयोद्धा राहीन. यातून त्यांनी समर्थकांना दिलासा दिला आहे. फिडेल कॅस्ट्रो यांनी सलगपणे अर्धशतक राज्य केले असले तरी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना दोन टर्मपेक्षा अधिक काळ पदावर राहता येणार नसल्याची घटना दुरुस्ती क्‍युबात केली गेली. त्या आधारेच राऊल कॅस्ट्रो यांना राष्ट्रपतीपद सोडावे लागले. आता पक्षाच्या जबाबदारीतून ते मुक्‍त होत आहेत. खऱ्या अर्थाने मागील सहा दशकांत पहिल्यांदाच कॅस्ट्रो सत्तेबाहेर गेल्याने कॅस्ट्रो युगाचा अंत म्हणून बाह्य जग याकडे पाहत आहे.

या घडामोडीं समवेतच पक्षाचे सतरा सदस्यीय पॉलिट ब्युरो निवडले गेले. त्यात महत्त्वाचे नाव आहे ते जनरल लुईस अलबर्ट यांचे. ते राऊल कॅस्ट्रो यांचे जावई आहेत. त्यांच्याकडे सैन्य विषयक समितीचे प्रमुखपद देखील आहे. क्‍युबात सरकारबरोबरच सैन्य हे सत्तेचे आणखी एक सत्ताकेंद्र आहे.त्याची तुलना इराणमधील खोमीनीच्या रेव्युलुशनरी गार्डशी केली तर ते चूक ठरू नये. नव्या सरकारला सैन्य व पक्ष यांच्यात समन्वय ठेवून काम करणे तारेवरची कसरत ठरणार आहे. शिवाय जनरल लुईससारखे नवे सत्ताकेंद्र पक्ष व सरकारवर लक्ष ठेवून असतील हे वेगळेच. विरोधक यास रिमोट कंट्रोल किंवा घराणेशाही म्हणतील, मात्र त्याची फिकीर राऊल कॅस्ट्रो करणार नाहीत. क्‍युबाच्या राष्ट्रपतिपदावर कोण आहे याने कॅस्ट्रो यांना फार काही फरक पडत नाही. देशात त्यांची लोकप्रियता व पक्षातील दरारा सहजपणे संपणारा नाही. विद्यमान राष्ट्रपती मिगुल डियाज हे राऊल यांच्या मर्जीतील.

आजवरील आर्थिक धोरणात त्यांनी किंचित सुधारणा करीत नव्या बदलास त्यांनी आरंभ केला. दोन वर्षांत 127 व्यवसायांचे नियंत्रण सरकारच्या हातून काढून घेत त्यांनी ते सार्वत्रिक केले. सिगार व शुगर (साखर) ही तेथील मुख्य निर्यात. अर्थव्यवस्थेचे तेच प्रमुख बलस्थान. पर्यटनाला भरपूर वाव असताना मात्र त्यांनी त्यास द्वार खुले केले नाही. विदेशी पर्यटकांसोबत देशात खुलेपणा येऊन लोकशाहीचे बीजरोपण होण्याचा धोका क्‍युबाच्या राज्यकर्त्यांना नेहमी वाटत आलेला आहे. अमेरिकी पर्यटकांना तर ते कायमच संशयाने पाहतात. अमेरिकेच्या मायामी बीचपासून क्‍युबा हाकेच्या अंतरावर. मात्र मायामीसारखे पर्यटनकेंद्र विकसित करण्यास क्‍युबाचे राज्यकर्ते पर्यटन उद्योग म्हणावा तितका विकसित करू शकले नाहीत.

क्‍युबाच्या शेजारी अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य आहे. तेथील बहुसंख्य जनता क्‍युबावर प्रेम करणारी, मात्र तितकीच कॅस्ट्रो कुटुंबाचा द्वेष करणारी. या राज्यातून अनपेक्षितपणे जो बायडेन यांना निवडणुकीत आघाडी मिळाली अन्‌ त्यांचा विजय सुकर झाला. नवे राष्ट्रपती बायडेन हे क्‍युबाशी पूर्वीप्रमाणे संबंध ताणतात की जवळीक वाढवितात, हे महत्त्वाचे असेल. दोन्हीकडे नवे राज्यकर्ते आहेत. मागील कटू अनुभव विसरून दोन्ही देशांत नवे पर्व सुरू होण्याची शक्‍यता धूसर असली तरी शेजारील अनेक देश आशावादी आहेत. क्‍यूबन म्युझिक, रम, सिगार, शुगर, नृत्य, पर्यटन, समुद्र किनारे हे क्‍युबाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे घटक आहेत.

आता सोव्हिएत युनियन अस्तित्वात नाही, अन्‌ क्‍युबात कॅस्ट्रो सत्तेत नाहीत. त्यामुळे शीतयुद्धातील कटुता विसरून नव्या बदलांना सामोरे जाण्याचे धाडस क्‍युबाच्या सत्ताधाऱ्यांना दाखवावे लागेल. क्‍युबा सुधारणावादी झाला अगर सनातनी राहिला, त्याने अमेरिकेला फार काही फरक पडणार नाही. आता काळ बदलला आहे, याची जाणीव ठेवून क्‍युबातील नवे सत्ताधारी वागतात की पूर्वसुरींच्या वाटेवर चालतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.